समुद्रात बुडालेल्या बोटीचा आंखो देखा रिपोर्ट

समुद्रात बुडालेल्या बोटीचा आंखो देखा रिपोर्ट

मुंबई : आज दुपारी साडेतीनच्या सुमारास गेट वे ऑफ इंडिया पासून चार बोटी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या उद्घाटन स्थळाकडे निघाल्या. त्यांच्या मागून आणखी एक बोट आली. अशा पाच बोटी समुद्रात निघाल्या. त्यातील दोन स्पीड बोटी होत्या. एका मोठ्या बोटीवर विविध माध्यमांचे पत्रकार होते.. एका बोटीवर शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, आमदार राज पुरोहीत आणि त्यांचे काही कार्यकर्ते होते. तर इतर बोटींवर अनेक प्रशासकीय अधिकारी, कार्यकर्ते होते. 

जी स्पीड बोट पाण्यात बुडाली, त्यावर प्रशासकीय अधिकारी आणि काही कार्यकर्ते असे साधारण 20 ते 25 लोक होते. ही बोट गेट वे ऑफ इंडियापासून साधारण एक किमी अंतरावर कुलाबा परिसरात गेली. तिले लाल टेनजवळ समुद्रात अनेक मोठे दगड आहेत. त्यातच काही काळापूर्वी तिथे एक बोट बुडाली होती. त्या बुडालेल्या बोटीवरच या अधिकाऱ्यांची बोट आदळली. बोट एवढ्या जोरात आदळली, की त्यामुळे बोटीला छिद्र पडले आणि पाणी मोठ्या प्रमाणत बोटीत शिरण्यास सुरूवात झाली. हे पाहून बोटीवरील सर्वच जण धास्तावले आणि आरडा-ओरडा सुरू झाला. काही वेळातच बोट एका बाजूने पलटली. प्रसंगावधान साधून बोटीतील एका अधिकाऱ्याने किनाऱ्यावरील कोस्ट गार्डला फोन केला. त्यानंतर काही वेळातच कोस्ट गार्डकडून दोन छोट्या बोटी घटनास्थळावर पाठविण्यात आल्या. बोटीवरील सर्व अधिकाऱ्यांना सुखरूप दुसऱ्या बोटींवर घेण्यात आले. परंतु, या बोटीवर आमदार विनायक मेटे यांचा सिद्धार्थ पवार नावाचा कार्यकर्ता बेपत्ता झाला होता. रात्री साडेआठच्या सुमारास त्याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. पवार यांचा मृतदेह सेंट जॉर्ज हॉस्पीटल मध्ये हलविण्यात आला आहे.

बाहेर काढण्यात आलेल्या अधिकाऱ्यांपैकी एका अधिकाऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे तर एका अधिकाऱ्याचा भीतीने रक्तदाब वाढला. या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घडामोडींमुळे स्मारकाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. आमदार विनायक मेटे, राज पुरोहीत यांच्या बोटी परत किनाऱ्यावर परत आणण्यात आल्या. आपल्या डोळ्यासमोर काही अधिकाऱ्यांची बोट बुडताना आणि त्यांचा आरडा-ओरडा पाहून पत्रकारांच्या बोटीसह इतरही बोटीमधील सर्वजण धास्तावले होते. त्यात हेलिकॉप्टरच्या घिरट्या घालण्याने आणखी भर पडली.

हा जीवन-मरणाचा खेळ तब्बल अडीच ते तीन तास सुरू होता. आमदार मेटे यांनी सिद्दार्थ पवार नावाचा आमचा एक कार्यकर्ता बेपत्ता असल्याची माहिती दिली. काही वेळानंतर शिक्षण मंत्री विनोद तावडे तिथे आले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. बोट नक्की कशावर आदळली, कोणाची चूक होती याची सखोल चौकशी केली जाईल. असे तावडेंनी सांगितले.

प्रशासनाचा सर्व सावळा गोंधळ
सुरवातीला पाठविण्यात आलेल्या सर्व बोटींवर लाईफ जॅकेट पुरविण्यात आले होते. परंतु, लोकांना बाहेर काढण्यासाठी बोटी पाठविण्यात आल्या. त्यावर कोणत्याही प्रकारची लाईफ जॅकेट नव्हते. बोटीत लाईफ गार्डही नव्हते. आम्हाला दुसऱ्या बोटीवर हलविण्यात आले तेव्हा आमच्याकडे लाईफ जॅकेट नव्हते. प्रशासनाकडून सुरक्षेची कुठलीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. आमदार मेटे ज्या बोटीत होते, त्या बोटींमध्येही लाईफ जॅकेट नसल्याचे आम्हाला जाणवले. जी बोट पाण्यात बुडत होती त्यातील अधिकाऱ्यांनाही लाईफ जॅकेट देण्यात आले नव्हते. जेव्हा आपण बुडणाऱ्या बोटीचा व्हिडिओ पाहू तेव्हा आपल्या लगेच लक्षात येईल.

पत्रकारांची बोट फिरत होती तासभर

पत्रकारांची एक बोट पुढे गेली होती. स्मारक उभे करण्यात येणारा 65 एकराचा भाग खडकाळ आहे आणि पत्रकारांची बोट मोठी असल्यामुळे खडकाच्या जवळ जाऊ शकत नव्हती. परंतु, मोठी बोट तिथे जाऊ शकत नाही हे माहीत असूनही छोट्या बोटींची व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे नेमकी कुठे स्मारकाची उभारणी करणार आहेत, हे कळायचा मार्गच नव्हता. खडकाळ भाग असल्यामुळे तिथे केवळ छोट्या बोटीच जाऊ शकत होत्या. त्यामुळे छोट्या बोटींची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. यातच जवळपास एक तास पत्रकारांची बोट अशीच पाण्यात फिरत होती. परंतु, सर्व पत्रकार सुखरूप आहेत. बोटी किनाऱ्यावर आल्यानंतर सर्वांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. कुणाचा रक्तदाब वाढला आहे का किंवा इतरही काही त्रास होतो आहे का याची खात्री करून त्यांना सोडण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com