Loksabha 2019 : संविधानाचा अवमान सहन करणार नाही - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

मोदी सरकारच्या काळात शेतीबरोबरच उद्योगांबाबत धोरण नसल्याने नवीन उद्योगधंदे महाराष्ट्रात आले नाहीत. यामुळे एकेकाळी औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली आहे, असा आरोपही पवार यांनी केला.

मिरा रोड - आज सीबीआय, रिझर्व्ह बॅंक, सर्वोच्च न्यायालय आदी घटनात्मक संस्थांवर हल्ला झाला आणि आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर पर्यायाने लोकशाही व्यवस्थेवर हल्ला करण्याचा प्रयत्न होत आहे; मात्र संविधानाचा अवमान सहन केला जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे दिला.

मोदी सरकारच्या काळात शेतीबरोबरच उद्योगांबाबत धोरण नसल्याने नवीन उद्योगधंदे महाराष्ट्रात आले नाहीत. यामुळे एकेकाळी औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली आहे, असा आरोपही पवार यांनी केला.

मिरा-भाईंदर येथील मेडतीया मैदानात संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारसभेत शरद पवार बोलत होते. या वेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मुझफ्फर हुसेन, संजीव नाईक, काँग्रेस प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत, काँग्रेस सरचिटणीस संदीप कुमार, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे आदी उपस्थित होते. एकेकाळी मुंबई संपूर्ण देशात उद्योगधंद्यासाठी प्रसिद्ध होती. परंतु मोदी सरकारच्या काळात महाराष्ट्रातील उद्योगधंदे संपले. त्यामुळे बेरोजगारी वाढली, यामुळे तरुणांना रोजगार निर्माण झाला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात शेतकरी आत्महत्येच्या कारणांचा प्रत्यक्ष जागेवर जाऊन शोध घेतला असता बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करू न शकल्याने ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले; पण मोदी सरकारच्या काळात ११ हजार ९९० शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊनही  दुष्काळ, पाणी, महागाई, रोजगार याबाबत नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील निवडणूक सभेत एक शब्दही बोलत नाहीत, अशी टीका पवार यांनी या वेळी केली.

काँग्रेस सरकारच्या काळात राफेल हे लढाऊ विमान खरेदी करण्यात येणार होते. त्या वेळी राफेलची किंमत ३५० कोटी इतकी होती; मात्र सरकार बदलल्यानंतर अचानक राफेलच्या किमतीमध्ये तीन पट वाढ कशी झाली? राफेल प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार असून नरेंद्र मोदी विमानाची किंमत सांगत नाहीत. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला भाजपने तिकीट दिले आहे. एकीकडे देशप्रेम दाखवायचे; तर दुसरीकडे उमेदवारी द्यायची, असा भाजपचा दुटप्पी चेहरा असून देशातून भाजपला हद्दपार करा, असे आवाहन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.

‘विधानसभेतही एकत्र’
लोकसभेत विजयी होणारच; पण ४ महिन्यांनंतर येणाऱ्या विधानसभेतही आम्ही एकदिलाने राहणार आहे. त्याची सुरुवात मिरा-भाईंदर पासून करा, येथे काँग्रेसने योग्य उमेदवार द्यावा, असे शरद पवार यांनी सांगताच कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात याचे स्वागत केले.

Web Title: Sharad Pawar criticized the government meeting on mira bhayander