शिवसेनेतून 14 बंडखोरांची हकालपट्टी 

शिवसेनेतून 14 बंडखोरांची हकालपट्टी 

मुंबई : उशिरा का होईना, शिवसेनेला अखेर बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारावा लागला आहे. शिवसेनेने 14 बंडखोरांची हकालपट्टी केली असली, तरी तृप्ती सावंत, राजुल पटेल आणि संजय भालेराव यांना मात्र अभय दिले आहे. त्यामुळे काही ठिकाणची बंडखोरी शिवसेनापुरस्कृत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवस राहिले असतानाही शिवसेनेतील बंडखोरी शमण्याचे नाव घेत नाही. राज्यभरातील 30 पेक्षा अधिक बंडखोरांनी शिवसेनेच्या डोक्‍याला चांगलाच ताप दिला आहे. या बंडखोरांना पक्षनेतृत्वाने अनेक इशारे दिले; मात्र काहीही उपयोग झालेला नाही. सोलापूर दौऱ्यावर असलेले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही त्याची प्रचिती आल्यानंतर या बंडखोरांवर कारवाईचा निर्णय घाईघाईत घेण्यात आला.

त्यानंतर ठाकरे यांच्या आदेशाने सोलापूरमधील महेश कोठे, मोहोळ येथील मनोज शेजवाळ, नांदेड दक्षिणमधील प्रकाश कौडगे, हदगावमधील बाबुराव कदम यांच्यासह 14 बंडखोरांची हकालपट्टी करण्यात आली. 

शिवसेनेने राज्यभरातील बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारला असला, तरी मुंबईतील बंडखोरांना मात्र अभय दिले आहे. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना घाम फोडणाऱ्या वांद्रे पूर्व येथील तृप्ती सावंत, वर्सोव्यातील राजुल पटेल आणि घाटकोपर पश्‍चिम येथील संजय भालेराव या बंडखोरांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे ही बंडखोरी शिवसेनापुरस्कृत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com