एसटीचा स्वच्छतेसाठी साडेचारशे कोटींचा चुराडा!

प्रशांत कांबळे : सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

एसटीचा ५०० कोटींचा संचित तोटा तब्बल पाच हजार कोटी रुपयांवर पोचला असताना स्वच्छतेच्या नावावर तब्बल साडेचारशे कोटींचा चुराडा एसटी महामंडळाकडून करण्यात येत असल्याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे.

मुंबई : एसटीचा ५०० कोटींचा संचित तोटा तब्बल पाच हजार कोटी रुपयांवर पोचला असताना स्वच्छतेच्या नावावर तब्बल साडेचारशे कोटींचा चुराडा एसटी महामंडळाकडून करण्यात येत असल्याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे.

गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पांतर्गत कार्यालयातील स्वच्छतेसाठी एसटीने ‘ब्रिस्क’नामक कंपनीला कंत्राट दिले आहे. कंपनीकडून फक्‍त ‘कागदोपत्री’ स्वच्छता होत असतानाही या कंपनीला वर्षाला सुमारे १२५ कोटी रुपयांचे बिल राजकीय दबावापोटी दिले जात असल्याचा आरोप एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर केला आहे.

एसटीची सर्व स्थानके, बस, आगार परिसरासह एसटीच्या कार्यालयांतील दैनंदिन स्वच्छतेसाठी महामंडळाने ‘ब्रिस्क’ला ४४६ कोटी ९९ लाख रुपयांचे कंत्राट दिले आहे. दोन वर्षांपासून कंपनी राज्यात काम करत आहे. एसटीची स्थानके, आगार आणि गाड्या, कार्यालय स्वच्छ करण्याचे या कंपनीचे काम आहे. त्यासाठी कंपनीला पुरेसे मनुष्यबळ, अत्याधुनिक यंत्र, साहित्य वापरायचे आहे; मात्र कंपनीजवळ अपुऱ्या सुविधांमुळे एसटीची स्वच्छताच होत नसल्याचे दिसून येत आहे.

महामंडळाने ऑक्‍टोबर २०१७ मध्ये हे कंत्राट दिले होते. शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या थाटात या प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला होता; मात्र त्यानंतरही राज्यातील बस स्थानके, आगार, कार्यालय आणि गाड्या अस्वच्छ आहेत. अनेक आगारांमध्ये गाड्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना धुवाव्या लागत आहेत. त्यामुळे अस्वच्छ गाड्या रस्त्यांवर धावताना दिसून येत असल्याने, प्रवाशांमधून नाराजी व्यक्‍त करण्यात येत आहे. एसटी कार्यालयातील स्वच्छताच होत नसेल, तर कोट्यवधी रुपये खर्च करून एसटी महामंडळ आणखी तोट्यात घालण्यासाठी करण्यात येत आहे का, असा प्रश्‍न प्रवासी उपस्थित करत आहेत. यासंदर्भात एसटीचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

स्वच्छतेच्या प्रकल्पासाठी दिलेले कंत्राट २०२० पर्यंत राहणार आहे. यामध्ये स्वच्छतेच्या विविध कामांसाठी दर ठरवण्यात आले आहे. त्यामध्येही वर्षाला दहा टक्के वाढ देण्यात आली आहे. त्याप्रमाणे एसटी महामंडळ तब्बल वर्षाला १३ कोटी रुपयांची वाढ कंपनीला 
करून देत आहे.

एसटी महामंडळाकडून वेळेत बिल मिळाले तर कर्मचाऱ्यांना वेळेत पगार देता येतो. अन्यथा कामगार काम सोडून जातात. सर्वच आगारांमध्ये स्वच्छता आहे. गाड्याही रोज धुण्यात येतात. कंत्राटामधील उल्लेखाच्या तुलनेत प्रत्यक्षात साफसफाई करण्यासाठी कमी परिसर आणि कमी गाड्या धुण्यासाठी मिळत असल्याने कंपनीला कमी उत्पन्न मिळत आहे.
- विनोद राणे, महाव्यवस्थापक, ब्रिस्क कंपनी

अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव
एसटीच्या स्वच्छतेचे काम करणाऱ्या ‘ब्रिस्क’ कंपनीने अनेक विभागांमध्ये ‘क्रिस्टल’ या कंपनीला उपकंत्राट दिले आहे. स्वच्छता नसल्याने दरमहा काही आगारांमध्ये दंडसुद्धा करण्यात आला; तर एसटीचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी कंपनीचे काम योग्य नसल्याने बिल थांबवले होते; मात्र कंपनीकडून बिलासाठी एसटीच्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकल्यानंतर बिल अदा करण्यात आल्याचे एसटीच्या एका अधिकाऱ्यांनी नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST cleanliness worth Rs. 150 crore crushed