नोटाबंदीनंतरही नाटकाला उत्तम प्रतिसाद- सुनील बर्वे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 डिसेंबर 2016

"अमर फोटो स्टुडिओ'बाबत सुनील बर्वे यांची माहिती

मुंबई: मराठी रसिकांच्या नाटकांवरील प्रेमामुळेच आमच्या "अमर फोटो स्टुडिओ' या नाटकाला नोटाबंदीचा फटका बसला नाही, असे अभिनेता व निर्माता सुनील बर्वे यांनी सांगितले.

"अमर फोटो स्टुडिओ'बाबत सुनील बर्वे यांची माहिती

मुंबई: मराठी रसिकांच्या नाटकांवरील प्रेमामुळेच आमच्या "अमर फोटो स्टुडिओ' या नाटकाला नोटाबंदीचा फटका बसला नाही, असे अभिनेता व निर्माता सुनील बर्वे यांनी सांगितले.

सुप्रसिद्ध रंगकर्मी विनय आपटे यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त विनय आपटे प्रतिष्ठान आणि साठ्ये महाविद्यालयाच्या वतीने विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात "नोटाबंदीमुळे मनोरंजन क्षेत्रात निर्माण झालेली आव्हाने आणि संभाव्य उपाय' या विषयावर परिसंवाद झाला, त्या वेळी बर्वे बोलत होते.
या वेळी अभिनेत्री मुक्ता बर्वे, निर्माते व दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले, झी स्टुडिओचे प्रमुख निखिल साने, मालिका-चित्रपट निर्माते नितीन वैद्य, भरत दाभोळकर, अर्थतज्ज्ञ अच्युत गोडबोले आणि अजित भुरे उपस्थित होते. सुरुवातीला विनय आपटे यांच्याविषयीची चित्रफीत दाखवण्यात आली. साठ्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कविता रेगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

सुनील बर्वे म्हणाले की, नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला तेव्हा माझ्या "अमर फोटो स्टुडिओ' या नाटकाचे प्रयोग सुरू होते. ऑनलाईन बुकिंगमध्ये फक्त पाच-सहा तिकिटांची विक्री झाली होती. माझ्यासमोर केवळ दोन पर्याय होते. प्रयोग रद्द करणे किंवा परिस्थितीला सामोरे जाणे. मग मी जाहिरात दिली की फुकट नाटक पाहा. पैसे एकतर क्रेडिट-डेबिट कार्डने द्या किंवा धनादेश द्या. ते शक्‍य नसेल तर पैसे नंतर द्या; पण नाटक येऊन पाहा. या जाहिरातीचा चांगला परिणाम झाला. लोकांनी नाटकाला भरभरून प्रतिसाद दिला. गंमत म्हणजे कोणीही नाटक फुकट पाहिले नाही. मराठी माणसाचे नाटकांवरचे प्रेम यातून दिसले.

मुक्ता बर्वे म्हणाली की, या परिस्थितीतही "कोडमंत्र' नाटक बरे चालले. या नाटकाचे प्रयोग रद्द करण्याची वेळ माझ्यावर आली नाही. मुळात मराठी प्रेक्षकांना ऑनलाईन बुकिंग, कार्ड पेमेंट याची सवय नाही, ती आता करून घ्यावी लागेल. निर्माते-दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले म्हणाले की, आर्थिक आणीबाणी निर्माण होते तेव्हा जीवनावश्‍यक गरजा प्रथम आणि मनोरंजन नंतर, अशी लोकांची भावना असते. त्यामुळे लोक चित्रपट व नाटकाला फारसे जात नाहीत; मात्र अशा परिस्थितीतही पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवावर काहीही परिणाम झाला नाही.

एका चित्रपटाचे मध्य प्रदेशात सुरू असलेले चित्रीकरण थांबवावे लागले. नितीन वैद्य यांनी नोटाबंदीनंतर अचानक विविध वाहिन्यांवरील जाहिरातींचे प्रमाण कमी झाले आहे, याकडे लक्ष वेधले.

Web Title: sunil barve's statement on currency ban