सुनील तटकरे यांचा पुतण्या शिवसेनेत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

मुंबई - रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा पुतण्या संदीप तटकरे याने रोहा नगरपालिकेत काकांविरुद्ध शड्डू ठोकत राष्ट्रवादी फोडून शिवसेनेत आज प्रवेश केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हातचं घड्याळ सोडून शिवसेनेचा भगवा झेंडा आणि धनुष्यबाण हाती घेणार आहेत. 

मुंबई - रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा पुतण्या संदीप तटकरे याने रोहा नगरपालिकेत काकांविरुद्ध शड्डू ठोकत राष्ट्रवादी फोडून शिवसेनेत आज प्रवेश केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हातचं घड्याळ सोडून शिवसेनेचा भगवा झेंडा आणि धनुष्यबाण हाती घेणार आहेत. 

मुलगा आणि पुतण्या यांच्यातील वादामुळे रोह्यातील राजकीय नाट्य घडल्याची जोरदार चर्चा आहे. सुनील तटकरे यांचे बंधू विधान परिषदेतील आमदार अनिल तटकरे यांचे संदीप हे पुत्र आहेत. त्यांचे बंधू अवधूत हेही राष्ट्रवादीचे आमदार आहेत. गेले काही महिने तटकरे कुटुंबात धुसफूस सुरू असल्याची चर्चा होती. नगरपालिका निवडणूक जाहीर होताच सुनील तटकरे यांच्या रोहा नगरपालिकेत त्यांच्याविरुद्ध संदीपने हालचाली सुरू केल्या. शिवसेनेनेही संधीचा फायदा घेत संदीप तटकरे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली. संदीप तटकरे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर त्यांना मानणाऱ्या राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना भवनात केंद्रीय मंत्री अनंत गिते, आमदार भरत गोगवले आणि शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर या वेळी उपस्थित होते. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनील तटकरे आणि अनिल तटकरे यांच्या मुलांमधील वादाचे पर्यवसान पक्षीय फुटीत झाले आहे. रोह्याचे तत्कालीन नगराध्यक्ष आणि सुनील तटकरे यांचे बंधू अनिल यांचे सुपुत्र अवधूत तटकरे यांना श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊ नये, असा सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांचा आग्रह होता. मात्र, तटकरे यांना मतदारसंघ राखायचा असल्याने त्यांनी अवधूतच्या मागे बळ उभे केले. अनिकेत यांनी विरोधात भूमिका घेऊनही अवधूत तटकरे निवडून आले. मात्र, त्यानंतर काहीकाळातच सुनील तटकरे, त्यांची मुले आणि पुतण्यांमध्ये राजकीय वैमनस्य वाढत गेले. एवढंच नव्हे, तर मतदारसंघात त्यांना पक्षसंघटनेतून महत्त्व देणे बंद करण्यात आले. पुढे तर अवधूत तटकरे यांचा नगराध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यात आला. त्यानंतर समीर शेडगे यांना नगराध्यक्ष बनवण्यात आले. पुन्हा अल्पसंख्याक मते लक्षात घेऊन तटकरे यांना अहमद दर्जी यांना नगराध्यक्षपदी बसवायचे होते; पण समीर यांनी तटकरे यांचे ऐकले नाही.

Web Title: Sunil Tatkare's nephew joins Shiv Sena