राष्ट्रवादीचा कॉंग्रेसला दणका...!

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

विधान परिषदेचे तीन उमेदवार जाहीर
मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत आज राष्ट्रवादीने कॉंग्रेसवर करघोडी करत तीन उमेदवारांची घोषणा केली. आघाडीची बोलणी सुरू असताना राष्ट्रवादीने उमेदवार घोषित केल्याने आघाडीच्या निर्णयावर संशयाचे सावट आहे. मात्र, यवतमाळ-वाशीम मतदारसंघातला उमेदवार राष्ट्रवादीने जाहीर केला नसल्याने कॉंग्रेसला चर्चेसाठी अंतिम इशारा दिल्याचेही मानले जात आहे.

राष्ट्रवादीने आज भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी विद्यमान आमदार राजेंद्र जैन, सांगली-सातारा मतदारसंघात शेखर गोरे, तर पुणे मतदारसंघातून अनिल भोसले यांची उमेदवारी जाहीर केली.

कॉंग्रेसने सातारा-सांगली मतदारसंघावरचा दावा कायम ठेवला होता, माजी मंत्री पतंगराव कदम यांचे बंधू येथून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र, राष्ट्रवादीने हा मतदारसंघ सोडण्यास नकार देत उमेदवार जाहीर केल्याने आघाडीचा चेंडू आता कॉंग्रेसच्या कोर्टात टोलावला आहे.

यवतमाळ-वाशीममध्ये राष्ट्रवादीचे सध्या संदीप बजोरिया विधान परिषद सदस्य आहेत. मात्र, कॉंग्रेसकडे सर्वाधिक मतदान असल्याने यावर कॉंग्रेसने दावा केला आहे.

दरम्यान, जळगाव व नांदेड या दोन स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केले नाहीत. यामुळे सहापैकी प्रत्येकी तीन मतदारसंघाच्या वाटणीची बोलणी यशस्वी होण्याचे संकेत आहेत.

या अगोदर कॉंग्रेसने पदवीधरसाठी नाशिकमधून डॉ. सुधीर तांबे, तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून संजय खोडके यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, या मतदारसंघाच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे, आज राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केल्याने कॉंग्रेसमधील हालचालींना वेग आला आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार
भंडारा-गोंदिया - विद्यमान आमदार राजेंद्र जैन
सांगली-सातारा - शेखर गोरे
पुणे - अनिल भोसले

Web Title: three candidate declared by ncp