महाराष्ट्रात यापुढे युती नाही: उद्धव ठाकरेंची घोषणा

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 जानेवारी 2017

शिवसेनेच्या 50 वर्षांच्या इतिहासामध्ये या युतीमुळे 25 वर्षे वाया गेली. आम्ही सत्तेचे भुकेले नाही. आता यापासून पुढे शिवसेना एकहाती महाराष्ट्रामध्ये भगवा फडकावेल

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) आगामी निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर (भाजप) युती करणार नाही, अशी स्पष्ट घोषणा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज (गुरुवार) केली. ठाकरे यांच्या या घोषणेमुळे युतीसंदर्भात गेल्या काही दिवसांतील चर्चेस अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

मुंबईमधील निवडणुकीची काळजी वाटत नसल्याचे स्पष्ट करत ठाकरे यांनी शिवसेना "सगळ्या' निवडणुकांत जय मिळवेल, असा आशावाद व्यक्त केला. याचबरोबर, आता लढाईस सुरुवात झाली असल्याचा इशाराही त्यांनी दिला. बीएमसीबरोबरच, कोणत्याही ठिकाणी आता युती होणार नसल्याचे स्पष्ट संकेत ठाकरे यांनी दिले.

"मी भाजपबरोबर युती करणार नाही. आतापासून लढाईस सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या 50 वर्षांच्या इतिहासामध्ये या युतीमुळे 25 वर्षे वाया गेली. आम्ही सत्तेचे भुकेले नाही. आता यापासून पुढे शिवसेना एकहाती महाराष्ट्रामध्ये भगवा फडकावेल. सेना आता युतीसाठी कोणाचा दरवाजा ठोठावणार नाही,'' असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

बीएमसीची निवडणूक येत्या 21 फेब्रुवारी घेतली जाणार आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामधील महानगरपालिकेवरील सत्ता अर्थातच अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या पार्श्‍वभूमीवर, युती तोडण्याचा शिवसेनेचा हा निर्णय अत्यंत संवेदनशील मानल जात आहे. या निर्णयाचे मोठे राजकीय पडसाद उमटण्याची दाट शक्‍यता आहे.

Web Title: Uddhav Thackeray rules out alliance with BJP for BMC polls