अतिमहत्त्वाच्या कैद्यांवर विशेष लक्ष

मंगेश सौंदाळकर
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

तंदुरुस्त पोलिसांना नेमण्याच्या सूचना
मुंबई - भोपाळच्या तुरुंगातून कैद्यांनी पलायन केल्यानंतर राज्यातील सर्वच कारागृहांतील सुरक्षेत वाढ केली आहे. अतिमहत्त्वाच्या कैद्यांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी व तुरुंगातील महत्त्वाच्या ठिकाणांवर तंदुरुस्त पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे. भोपाळमध्ये कैद्यांनी स्टीलच्या ताटांचा तुकडा वापरून गार्डचा खून केला होता. त्याची दखल घेऊन सर्वच तुरुंगात कैद्यांना प्लास्टिकच्या ताटात जेवायला दिले जाणार आहे.

तंदुरुस्त पोलिसांना नेमण्याच्या सूचना
मुंबई - भोपाळच्या तुरुंगातून कैद्यांनी पलायन केल्यानंतर राज्यातील सर्वच कारागृहांतील सुरक्षेत वाढ केली आहे. अतिमहत्त्वाच्या कैद्यांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी व तुरुंगातील महत्त्वाच्या ठिकाणांवर तंदुरुस्त पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे. भोपाळमध्ये कैद्यांनी स्टीलच्या ताटांचा तुकडा वापरून गार्डचा खून केला होता. त्याची दखल घेऊन सर्वच तुरुंगात कैद्यांना प्लास्टिकच्या ताटात जेवायला दिले जाणार आहे.

तुरुंग प्रशासनांतर्गत राज्यात नऊ मध्यवर्ती, 31 जिल्हा तुरुंग, 13 खुली, एक खुली वसाहत, 172 उपतुरुंग आहेत. प्रमुख तुरुंगांमध्ये अतिमहत्त्वाचे कैदी असतात. भोपाळच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, याची तुरुंग प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. तुरुंगातील कैद्यांना भेटण्यासाठी कोण येतात? ते त्याचे नातेवाईक आहेत का? हे सक्तीने तपासले जाणार आहे.

कैदी कोणाला पत्र पाठवतात? त्यांना कोण पत्र पाठवतात, याकडे तुरुंगातील अधिकारी विशेष लक्ष ठेवून असणार आहेत. तुरुंगातील महत्त्वाच्या ठिकाणी तंदुरुस्त पोलिसांना ठेवले जावे, अशा सूचना दिल्या आहेत. सुरक्षेचा विचार करून अतिमहत्त्वाच्या कैद्यांना वेगळ्या बराकींमध्ये ठेवण्यास सुरुवात केली आहे. ऑर्थर रोड, ठाणे, येरवडा आणि तळोजा तुरुंगात अतिमहत्त्वाचे कैदी शिक्षा भोगत आहेत. सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून बराकींवर लक्ष ठेवले जाईल. भोपाळच्या घटनेनंतर सर्वच बराकींबाहेर दोन गार्ड तैनात केले जात आहेत. विशेष म्हणजे, तीन वर्षांपूर्वी नागपूरच्या तुरुंगातून पाच कैद्यांनी पलायन केल्याची घटना घडली होती. त्यानंतर तुरुंगाच्या भिंती वाढवण्यात आल्या. तसेच कल्याण, नाशिक आणि औरंगाबाद येथे भिंतींना विजेच्या तारांचे कुंपण लावण्यात आले. या तारांमधून रात्रीच्या वेळी विद्युत प्रवाह सुरू असल्याने कैद्याने भिंतींवर चढून जाण्याचा प्रयत्न केल्यास अलार्म वाजतो. काही वर्षांपूर्वी कल्याण येथील तुरुंगातून पहाटेच्या सुमारास वीजपुरवठा बंद झाल्यानंतर आरोपींनी पळ काढला होता.

भोपाळमध्ये पलायन केलेल्या कैद्यांनी गार्डचा खून करण्यासाठी स्टील प्लेटच्या तुकड्याचा वापर केला होता. काही महिन्यांपूर्वी ऑर्थर रोडमध्येही कैद्यांनी एकमेकांवर हल्ला करताना स्टील प्लेटच्या तुकड्याचा वापर केला होता. या घटना पाहता लवकर सर्वच महत्त्वाच्या कारागृहांत स्टीलच्या प्लेट हद्दपार केल्या जातील. कैद्यांना प्लास्टिकच्या ताटातूनच जेवण दिले जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: VIP prisoners on special focus