esakal | सोहळे थांबले... दुग्धजन्य पदार्थांवर संकट

बोलून बातमी शोधा

Ceremonies stopped ... crisis over dairy products}

अनेक लग्न सोहळे पुढे ढकलण्यात आले आहेत. दुधापासून बनवल्या जाणाऱ्या उपपदार्थांच्या उलाढालीलाही याचा मोठा फटका बसला आहे.

सोहळे थांबले... दुग्धजन्य पदार्थांवर संकट
sakal_logo
By
अजित झळके

सांगली  : कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्य शासनाने पुन्हा एकदा लग्न सोहळे आणि सभा-समारंभांवर नियंत्रण आणले आहे. पन्नासहून अधिक लोकांना या एकत्र येण्यास मज्जाव करत गुन्हे दाखल केले जात आहेत. अनेक लग्न सोहळे पुढे ढकलण्यात आले आहेत. अनेकांनी थोडक्‍यात सोहळा उरकला. या साऱ्याचा परिणाम खाद्य क्षेत्रावर झाला आहे. दुधापासून बनवल्या जाणाऱ्या उपपदार्थांच्या उलाढालीलाही याचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात दररोज 60 हजार लिटर दुग्धजन्य पदार्थनिर्मिती होते. हॉटेल सुरू आहेत, ही समाधानाची बाब असली, तरी सोहळे बंद झाल्याने त्यावर किमान 60 टक्के परिणाम झाला आहे. 

सोहळा कोणताही असो, गोड पदार्थ लागतोच. त्यातही श्रीखंड, आम्रखंड, फ्रूटखंड, बासुंदी, गुलाबजाम या पदार्थांना सर्वाधिक मागणी असते. जिलेबी असेल, तर मठ्ठा लागतोच. लग्न सोहळा "हाय-फाय' असेल, तर सोबतीला आईस्क्रीम असते. एक हजार लोकांचे जेवण असेल तर 120 ते 130 किलो श्रीखंड लागते. सरासरी 200 रुपये किलो दराने त्याचे 24 हजार रुपये होतात. हेच लग्न 50-100 लोकांमध्ये करायचे असल्याने त्याची गरज 10 किलोवर आली आहे. परिणामी, 2 ते अडीच हजार रुपयांचेच श्रीखंड लागते. बासुंदी असेल तर ती 125 लिटरहून अधिक लागते. मठ्ठा किमान 400 ते 500 लिटर लागतो. सारेच प्रमाण 70 ते 80 टक्‍क्‍यांनी घटले आहे. 

गेल्यावर्षी एप्रिल, मे आणि जून हा हक्काचा हंगाम वाया गेल्याने दुग्धजन्य पदार्थ निर्मिती क्षेत्राला मोठा दणका बसला होता. त्या काळात हॉटेल्स बंद होतीच. त्यामुळे उपपदार्थ निर्मितीही थांबली होती. आता हॉटेल्स सुरू असल्याने त्या क्षेत्राची मागणी कायम आहे. कोरोनाचे आकडे वाढायला लागले, तर तेथील गर्दीवरही परिणाम संभवतो. त्यामुळे या क्षेत्राला चिंता लागून राहिली आहे. जिल्ह्यातील दूध क्षेत्रासाठी ही चिंतेची बाब आहे. सध्या दररोज सरासरी 12 लाख लिटर दूध संकलन असून, सुमारे 5 टक्के उपपदार्थ निर्मिती सुरू आहे. हे प्रमाण वाढले तरच दूध भुकटीचा टक्का कमी होणार आहे. जोवर सोहळे पूर्ववत होत नाहीत, तोवर या क्षेत्रासमोर संकट असणार आहे. 

दूध संकलन (लिटरमध्ये) (स्रोत ः शासकीय दूध डेअरी, मिरज) 

 • सहकारी संघ : 3 लाख 46 हजार 873 
 • बहुराज्य संघ : 2 लाख 14 हजार 789 
 • खासगी संघ : 6 लाख 34 हजार 898 
 • एकूण : 11 लाख 96 हजार 560 

दुधापासून उपपदार्थ निर्मिती (दररोज) (लिटरमध्ये) 

 • सहकारी संघ : 11 हजार 354 
 • बहुराज्य संघ : 11 हजार 865 
 • खासगी संघ : 37 हजार 980 
 • एकूण : 61 हजार 199 

वितरणाचे सर्वसाधारण प्रमाण 

 • भुकटी : 10.83 टक्के 
 • पिशवीतून वितरण : 47.91 टक्के 
 • राज्यांतर्गत वितरण : 36.08 टक्के 
 • उपपदार्थ निर्मिती : 5.8 टक्के 

मागणीवर मोठा परिणाम
दुधापासून उपपदार्थ निर्मिती क्षेत्रात आम्ही नव्याने पदार्पण केले आहे. त्यात अडचणींची मालिकाच सुरू आहे. जानेवारी ते मे हा खरा हंगाम असतो. तोच वाया गेला तर व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे राहणार आहे. सध्या मागणीवर मोठा परिणाम झाला आहे. 
- स्मिता देशमुख, सीईओ, कॅंडी लाईफ कंपनी 

संपादन : युवराज यादव