सांगली महापालिकेच्या विद्यार्थ्यांचा लघु उपग्रह झेपावला 

बलराज पवार
Monday, 8 February 2021

सांगली महापालिकेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी तयार केलेला उपग्रह रामेश्वरम (तेलंगणा) येथून हेलियम फुग्याच्या साहाय्याने अवकाशात झेपावला.

सांगली : महापालिकेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी तयार केलेला उपग्रह रामेश्वरम (तेलंगणा) येथून हेलियम फुग्याच्या साहाय्याने अवकाशात झेपावला. सुमारे 35000 ते 38000 मीटर उंचीवर हे उपग्रह चार ते सहा तासांसाठी स्थिर करण्यात आले. त्यानंतर पुन्हा पृथ्वीवर परतले. यामुळे वातावरणातील बदल, सूर्याची अतिनील किरणे, ओझोनचा थर आदी बाबींची माहिती विद्यार्थ्यांना होण्यास मदत झाली.

रामेश्वरम येथे तेलंगणाच्या राज्यपाल श्रीमती तमिलीसाई सौंदर्याराजन यांच्या हस्ते आणि इस्रोचे माजी संचालक डॉ. ए. शिवथानू पिलाई, मार्टिन चॅरिटेबल ट्रस्टच्या मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. लिमा रोज मार्टीन व इस्रोचे डायरेक्‍टर पद्मश्री डॉ. मल्लयस्वामी अण्णादुराई यांच्या उपस्थितीत उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे जनरल सेक्रेटरी मिलिंद चौधरी आणि राज्य समन्वयक मनीषा चौधरी उपस्थित होते. 

सांगलीसह देशभरातील एक हजार विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या 100 लघु उपग्रहांचे हेलियम फुग्यांच्या साहाय्याने प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी देशभरातील शास्त्रज्ञ, विद्यार्थी उपस्थित होते. रामेश्वरम येथील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आंतरराष्ट्रीय फाउंडेशन यांच्याकडून या "पेलोड क्‍युबस चॅलेंज-2021'चे आयोजन करण्यात आले होते.

यासाठी सांगली महापालिका क्षेत्रातील पाच शाळांमधील दहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. प्रतीक्षा मुडशी, किशोरी मादीग, लखन हाके, ओंकार मगदूम, योगेश कुरवलकर, दर्शन बुरांडे, साकिब सय्यद, समीर शेख, विजय हिरेमठ, राजू भंडारे यांनी उपग्रह तयार करून फाउंडेशनकडे पाठवला होता. आपण तयार केलेल्या उपग्रहाचे प्रक्षेपण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. 

या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसह विविध जागतिक विक्रमांच्या पुस्तकात नोंद झाली आहे. या लघु उपग्रह निर्मितीच्या प्रकल्पात महापालिकेचे शिक्षक अश्विनी वांडरे, शैलजा कोरे, कल्पना माळी, अनिता पाटील, मनीषा चौधरी, मोहित चौधरी, मांतेश कांबळे, दिनकर आदाटे, सलीम चौगुले, संतोष पाटील, विशाल भोंडवे यांनी विद्यार्थ्यांना मदत केली.

महापालिकेचे प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार, सहायक कार्यक्रम अधिकारी सतीश कांबळे यांनी यासाठी नियोजन केले. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 

संपादन :  युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A small satellite of Sangli Municipal Corporation students launched