येळापूरपैकी गळवेवाडी मैदान सुदेश ठाकूरने मारले

बाजीराव घोडे
Monday, 22 February 2021

येळापूर पैकी गवळेवाडी (ता. शिराळा, जि. सांगली ) येथे आयोजित कुस्ती मैदानात सांगलीच्या सुदेश ठाकूरने विकास पाटीलवर गुणांनी विजय मिळवला.

कोकरुड ः येळापूर पैकी गवळेवाडी (ता. शिराळा, जि. सांगली ) येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची लढत विकास पाटील (कोल्हापूर) विरुद्ध सुदेश ठाकूर (सांगली) यांची डाव-प्रतिडाव करत अटीतटीची झाली. 20 मिनिटे लढत चालली. अखेर पंचांनी कुस्ती गुणांवर घेतली. सांगलीच्या सुदेश ठाकूरने विकास पाटीलवर गुणांनी विजय मिळवला.

वस्ताद विठोबा लोहार, शिवाजी लाड, सुरेश चिंचोलकर, सरपंच बाबा गोळे, आबा शिंदे, विलास गवळी यांच्या हस्ते मैदानाचे उद्‌घाटन झाले. दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीत सुकुमार जाधवने संदीप बंडगरवर 14 व्या मिनिटाला विजय मिळवीत शौकिनांची मने जिंकली. 

तिसऱ्या क्रमांकाची दत्ता बानकर विरुद्ध सुरज पाटील लढत दत्ता बानकर यांने गुणांवर जिंकली. चौथ्या क्रमांकाच्या लढतीत अजय शेडगेने शुभम पाटीलला 11 व्या मिनिटाला चितपट केले. पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत वैभव यादवने अनिकेत खोतवर एकलांगी डावाने विजय मिळवला. 
सहाव्या कुस्तीत बाजीराव मानेने रवी शिंदेवर तिसऱ्या मिनिटास दुहेरी पट काढत विजय मिळवला. सातव्या क्रमांकाच्या कुस्तीत सुमित खांडेकरने ओंकार जाधववर एकचाक डावाने चितपट केले.

इतर विजयी मल्ल - कर्तार कांबळे, आशुतोष लाड, विशाल जाधव, प्रदीप पाटील, विवेक लाड, अभिजित पाटील, सुशांत गायकवाड, वेदांत कडोले, शंभूराज पाटील, गणेश पवार, आदित्य लाड, सुरज गोळे, सौरभ पाटील, अमर पाटील, प्रणव जाधव, रोहन माने, मयूर रोकडे, स्वीकार सावंत, राजवर्धन पाटील, संकेत नेर्लेकर, अथर्व पाटील, साहिल वाघमारे, शुभम गोळे, रोशन पाटील, शंकर भोसले यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला.

उपमहाराष्ट्र केसरी संपतराव जाधव, शिवाजी पाटील, मारुती पाटील, राहुल जाधव, नाना गायकवाड यांनी पंच म्हणून काम पाहिले. सुरेश जाधव यांनी समालोचन केले. ऑलिंपिकवीर बंडा पाटील-रेठरेकर, उपमहाराष्ट्र केसरी संपत जाधव, सुभाष लाड, युवानेते सुहास घोडे, दिनकर दिंडे, सरपंच मारुती कांबळे, किसन जाधव, बाबासाहेब पवार, तानाजी चवरे, विकास शिरसट, बंडू निकम, मारुती पवार प्रमुख उपस्थितीत होते. 

संपादन :  युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sudesh Thakur won Galvewadi wrestling competition in Yelapur