
पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीने वाहतूकदारांचे कंबरडे मोडले आहे.
सांगली : पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीने वाहतूकदारांचे कंबरडे मोडले आहे. माल वाहतूक, सहलीचे वाहतूकदार आणि शहरांतर्गत रिक्षा वाहतूकदारांची कोंडी झाली आहे. कोरोना संकटानंतर चाके धावायला लागली, मात्र इंधन दरवाढीने खिसा रिकामाच राहतोय, अशा भावना त्यांनी "सकाळ' शी बोलताना व्यक्त केल्या.
जिल्ह्यात इंधन दराचा उच्चांक झाला आहे. दर दररोज वाढतो आहे. "ही दरवाढ कमी करणे शक्य नसेल तर किमान किलोमीटरचे दगड जवळ करा, अव्हरेज वाढल्याचे समाधान तरी मिळेल', अशी उपहासात्मक अपेक्षा वाहनधारक करत आहेत. राजकीय पक्षांनी मोर्चा काढून त्याचा निषेध केला आहे. कोरोना पश्चात ही वाढ सातत्याने असल्याने वाहन धारक नव्या चक्रव्यूहात अडकले आहेत.
व्यवसाय संकटात सापडला आहे
मालवाहतूक ट्रकला भाड्याच्या 40 ते 45 टक्के पैसे डिझेलवर खर्च होत आहेत. ट्रक एक किलोमीटर फिरायला 24 ते 25 रुपये खर्च होतो. हे गणित परवडणारे नाही. त्या प्रमाणात भाडेवाढ नाही. आधीच कोरोना काळात चाके थांबली. आज स्थिती 100 टक्के पूर्ववत नाही. व्यवसाय करायची की नाही? करारावर वाहने आहेत, त्या ठिकाणी थोडी वाढ मिळेल, खुल्या बाजाराचे धोरण मागणी व पुरवठ्यावर ठरते. मागणी कमी व वाहने जास्त आहे. व्यवसाय संकटात सापडला आहे. डिझेल जीएसटी कक्षेत येत नाही, तोवर कठीण आहे.
- महेश पाटील, जिल्हा वाहतूकदार संघटना
इंधन दरवाढीने निराशा केली
डिझेल दरवाढीने पुन्हा कंबरडे मोडले. कोरोना काळानंतर कोकण, गोवा, कर्नाटक भागात सहली वाढल्या, मात्र थोडी दरवाढ केली तरी नाराजी आहे. आधी ट्रॅव्हलरसाठी 17 रुपये किलोमीटर दर होता. तो आता 18 रुपये करावा लागला. तोही परवडत नाही. कोरोना काळात तर भिकाऱ्यांपेक्षा बिकट अवस्था होती. नंतर आशा लागली, पण तोवर इंधन दरवाढीने निराशा केली.
- रमेश जगदाळे, प्रवासी वाहतूकदार, हरिपूर
काहींनी व्यवसाय सोडून मजुरी सुरू केली
पेट्रोल, एलपीजी आणि डिझेलवर रिक्षा सुरू आहेत. एलपीजी लिटरला 56 रुपये झाला. रिक्षात जास्त लोक बसवून चालत नाही. व्यवसाय कमी झाला आहे. दिवसात सरासरी 400 ते 500 रुपयांवर व्यवसाय नाही. जादा भाडे मागून चालत नाही. रिक्षा चालकांना मदतीची शासनाकडून अपेक्षा केली, मात्र काडीची मदत झाली नाही. बॅंकांचे व्याज तरी माफ करावे, ही अपेक्षा होती. रिक्षा ओढून नेल्या जात आहेत. काहींनी व्यवसाय सोडून मजुरी सुरू केली.
- सुरेश गलांडे, सदस्य, राज्य रिक्षा कृती समिती
संपादन : युवराज यादव