मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तावरून येताना महिला पोलिसाचा अपघाती मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अक्कलकोट येथील बंदोबस्त संपूवन सोलापूरकडे दुचाकीवरून येताना एसटी बसच्या धडकेने महिला पोलिस शिपाई आरती दीपक साबळे (वय 31) यांचा मृत्यू झाला.

सोलापूर  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अक्कलकोट येथील बंदोबस्त संपूवन सोलापूरकडे दुचाकीवरून येताना एसटी बसच्या धडकेने महिला पोलिस शिपाई आरती दीपक साबळे (वय 31) यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. 

साबळे यांची नियुक्त सोलापूर ग्रामीण पोलिस मुख्यालयात होती. सोलापूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस व इतर नेते बुधवारी दुपारी अक्कलकोटमध्ये आले होते. प्रचारसभेचे बंदोबस्त संपवून पोलिस शिपाई आरती साबळे व त्यांच्या सहकारी बानोबी शेख या दुचाकीवरून सोलापूरकडे निघाल्या.

अक्कलकोट रस्त्यावरील कोन्हाळीजवळ एसटी बसने मागून दुचाकीला धडक दिली. या घटनेत साबळे व शेख या दोघीही जखमी झाल्या. दोघींना तातडीने कुंभारी येथील अश्‍विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वी साबळे यांचा मृत्यू झाला. शेख यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

साबळे या 5 जानेवारी 2013 रोजी पोलिस दलात दाखल झाल्या होत्या. त्यांना तीन वर्षाची मुलगी, दीड वर्षाचा मुलगा आहे.

Web Title: Accidental death of policewomen coming from the Chief Ministers Settlement