नखांनी ओरबाडल्यासारख्या आरोपींच्या अंगावर खुणा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

नगर - लोणी मावळा येथे शालेय मुलीवरील बलात्कार व खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींच्या अंगावर नखांनी ओरबाडल्यासारख्या खुणा होत्या, अशी साक्ष पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या तत्कालीन वैद्यकीय अधिकारी योगिनी शेळके यांनी सोमवारी दिली. त्यांच्यासह आज मोटारसायकल खरेदी-विक्री करणाऱ्या दुकानदारांचीही साक्ष झाली. 

जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू आहे. पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या तत्कालीन वैद्यकीय अधिकारी योगिनी शेळके व आळेफाटा येथील मोटारसायकल खरेदी-विक्री करणारे दुकानदार अशोक बायस यांची आज साक्ष झाली. सरकारी पक्षातर्फे ऍड. उज्ज्वल निकम यांनी डॉ. शेळके यांची सरतपासणी घेतली. आरोपी संतोष लोणकर, मंगेश लोणकर, दत्तात्रेय शिंदे यांच्या अंगावर नखाने ओरबाडल्यासारख्या जखमा होत्या. तसे वैद्यकीय प्रमाणपत्रातही म्हटले आहे. पीडित मुलीने अत्याचाराला प्रतिकार केल्यामुळे आरोपींच्या अंगावर जखमा झाल्या असाव्यात, अशी साक्ष डॉ. शेळके यांनी दिली. मुख्य आरोपी लोणकर याच्या रक्ताचे नमुने "डीएनए' चाचणीसाठी पाठविल्याचेही त्या म्हणाल्या. आरोपीतर्फे ऍड. अनिल आरोटे यांनी त्यांची उलटतपासणी घेतली. 

मुख्य आरोपी लोणकर याने या घटनेच्या अगोदर 15 दिवसांपूर्वी दुकानातून मोटारसायकल खरेदी केली होती, अशी साक्ष बायस यांनी दिली; मात्र त्यांनी न्यायालयात मोटारसायकल खरेदी-विक्रीबाबत सादर केलेल्या पावत्यांमधील तारखा चुकीच्या असल्याची बाब आरोपीचे वकील आरोटे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे दुकानाचा परवाना, मोटारसायकल खरेदी-विक्रीचे नोंदणीपुस्तक व पॅनकार्ड मंगळवारी (ता. 8) सादर करावे, असा आदेश न्यायालयाने बायस यांना दिला. त्यांची उलटतपासणी उद्याच होणार आहे.

Web Title: Accused him like nail marks