धीर धरा आम्ही तुमच्या साेबतच : उध्दव ठाकरे

संजय जगताप
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सातारा जिल्ह्यातील मायणी येथे नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी केली. त्यानंतर ठाकरे यांनी शेतकऱयांना दिलासा दिला.

मायणी (जि. सातारा) ः उध्दवसाहेब आता तुम्हीच मुख्यमंत्री होणार हाय. तुम्ही वचन दिल्यासारखं आधी सातबारा कोरा करा. आर्थिक मदत करा. मोठ नुकसान झालंय. आताचा हंगाम तर गेलाच पण पुढच्या हंगामासाठी सुध्दा पाच सहा लाख रुपये घालावं लागणार हायत. सरकारनं मदत ही केलीच पाहिजे अशी आर्त मागणी येथील नुकसानग्रस्त शेतकरी शिवाजी देशमुख यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे केली.
 
डाऊनी रोगाने वाया गेलेल्या द्राक्ष बागेची पाहणी ठाकरे यांनी आज (शुक्रवार) येथे केली. त्यावेळी शिवसेना नेते नितीन बानुगडे पाटील, चंद्रकांत जाधव, संभाजीराव जगताप, रणजीत भोसले, संजय भोसले, युवराज पाटील, बाळासाहेब जाधव, सचिन भिसे, सचिन माने यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ठाकरे यांनी नुकसानग्रस्त बागेची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधला.

कराडकरांना शिवसेनेचे सहकार्य राहील ः विनायक राऊत

ते म्हणाले, शिवसेना नेहमी वचनाला जागत आली आहे. वचन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार. पावसामुळे राज्यात प्रचंड नुकसान झाले आहे. मी स्वत: सर्व ठिकाणी जाऊन पाहणी करतोय. मला मुख्यमंत्रीपद पाहिजे आहे म्हणुन मी ही पाहणी करीत फिरत नाही. मी तुम्हाला धीर देण्यासाठी आलोय. खचुन जावु नका. हे सांगायला मी आलोय. जीवन संपवुन प्रश्न सुटणार नाहीत.

प्रत्येक भागात शेतकरी मदत केंद्र सुरु करणार आहे. त्यामाध्यमातुन तुमच्या व्यथा मांडा. सर्वतोपरी मदत केली जाईल. तुम्ही मात्र धीर सोडु नका. शिवसेना नेहमीच तुमच्या पाठीशी राहिली आहे, आणि पुढेही राहणार.

नुकासनग्रस्त शेतकऱयांसाठी उद्धव ठाकरे यांची ही घाेषणा

दरम्यान, उध्दव ठाकरेंनी आपण वचनाचे पक्के असल्याचे पुन्हा एकदा सांगत माणचे शेखर गोरेंचा नामोल्लेख केला. शेखरला वचन दिल्याप्रमाणे विधामनसभेचे तिकीट दिले. सभेलाही आलो असे नमूद केले.या दौऱ्यात त्यांनी कोणाचेही पुष्पगुच्छ स्वीकारले नाहीत. शेतकरी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत नुकसानीचे पंचनामे झालेत की नाही, कोणत्या विमा कंपनीकडे विमा उतरविला आहे. याची सविस्तर माहिती मदत केंद्रामार्फत देण्याचे आवाहन केले.

ठाकरेंनी शेतकऱ्याचा घेतला फोन नंबर 

आता तुम्हीच मुख्यमंत्री होणार हाय. पहिली मदत मला द्या. नाही म्हणु नका. असा हट्ट शेतकऱ्याने धरताच ठाकरे यांनी मदत देणार जरा धीर धरा. दादा मला तुमचा नंबर द्या असा भावुक दिलासा ठाकरेंनी शिवाजी देशमुख यांना दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Be Patient And We Are With You Says Uddhav Thackeray