राज्यातील विविध नगरपंचायती, नगरपरिषदांसाठी 'या' तारखेला मतदान

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

निवडणुकांसाठी 4 ते 12 डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. 8 डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. छाननी 13 डिसेंबर रोजी होईल.

मुंबई  - कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड व हातकणंगले आणि यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी या नवनिर्मित तीन  नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक; तसेच 26 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील विविध 22 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 29 डिसेंबर रोजी मतदान; तर 30 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

हेही वाचा - महाविकास आघाडीमुळे राणेंना येथे बसणार धक्का 

श्री. मदान यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांसाठी 4 ते 12 डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. 8 डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. छाननी 13 डिसेंबर रोजी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी 18 डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी न्यायालयाचा निकाल आल्यानंतर तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. 29 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 30 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल.

हेही वाचा - मंत्रीपदासाठी कोऱ्या लेटरहेडवर सह्या मोहीम; पण कुणासाठी ? 

नगरपरिषद/ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुका:

मोर्शी, धरणगाव, रत्नागिरी आणि सावंतवाडी.

नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय पोटनिवडणूक होणाऱ्या जागांचा तपशील:

गडहिंग्लज- हद्दवाढ क्षेत्रासाठी, मलकापूर- 7ब, वाई- 8अ, खानापूर- 7, बार्शी- 5अ, मनमाड- 1ब, भुसावळ- 4अ, भडगाव- 3ड, नवापूर- 6अ आणि 7अ, परंडा- 7ब, कळंब- 8ब, उमरेड- 11अ, भिवापूर- 4, सिंधी (रेल्वे)- 8क, मोहाडी- 4, 9 आणि 12, साकोली- 6ब, कोरपणा- 16, भामरागड- 5 आणि 16.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagar Panchayat Election In State On 29 December