आरोपीच्या घराला 'सील' नाही 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

नगर - कोपर्डी येथे बलात्कार करून अल्पवयीन मुलीच्या खुनातील आरोपी नितीन गोपीनाथ भैलुमे याचे घर "सील' केलेले नाही. तेथे जाण्यासही कोणाला मज्जाव केला नसल्याचा लेखी खुलासा सरकारी पक्षाने न्यायालयाकडे सोमवारी सादर केला. 

नगर - कोपर्डी येथे बलात्कार करून अल्पवयीन मुलीच्या खुनातील आरोपी नितीन गोपीनाथ भैलुमे याचे घर "सील' केलेले नाही. तेथे जाण्यासही कोणाला मज्जाव केला नसल्याचा लेखी खुलासा सरकारी पक्षाने न्यायालयाकडे सोमवारी सादर केला. 

जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर आज या खटल्याची सुनावणी झाली. आरोपी भैलुमे याचे घर पोलिसांनी "सील' केल्याचे म्हणणे त्याचे वकील प्रकाश आहेर यांनी न्यायालयात मांडले होते. त्यावर सरकारी पक्षातर्फे राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी लेखी म्हणणे न्यायालयात सादर केले. कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून झाला, त्या दिवशी मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याच्याबरोबर नितीन भैलुमे व संतोष भवाळ हे आरोपी उपस्थित होते. त्या दिवशी त्यांनी तेथील रस्त्यावर पाळत ठेवली होती. हा गुन्हा करताना शिंदे यास भैलुमे व भवाळ यांनी मदत केली. तसे भक्कम पुरावे सरकारी पक्षाकडे आहेत. त्यामुळे भैलुमे यास जामीन देऊ नये; अन्यथा तो सरकारी पक्षाचे साक्षीदार फोडू शकतो, ही बाब निकम यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. भैलुमे याचे घर पोलिसांनी "सील' केलेले नाही. त्याला घरी जाण्यास मज्जाव केलेला नाही, असा लेखी खुलासा निकम यांनी केला. 

जामीनअर्जावर आज सुनावणी 

आरोपी नितीन भैलुमे याच्या दोषमुक्तीचा अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्याविरोधात आरोपीचे वकील प्रकाश आहेर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील केले आहे. त्याबाबतचा प्रगती अहवाल मंगळवारी (ता.8) येथील न्यायालयात सादर करणार असल्याचे आहेर यांनी सांगितले. त्यामुळे आरोपी भैलुमे याच्या जामीनअर्जावर उद्या दुपारी निर्णय होणार आहे.

Web Title: No seal for accused home