इस्लामपूरच्या शैलजाताई पूरग्रस्तांच्या मदतीला

विजय लोहार
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

पुरात अडकून पडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी विविध संस्था, बचाव पथके अथक प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पत्नी शैलेजा जयंत पाटील यांनीही पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

कोल्हापूर - घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि साताऱ्यातील १ लाख ३२ हजार ३६० नागरीकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून, सुमारे एक लाख नागरीक अजूनही अडकून पडले आहेत. पुरात अडकून पडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी विविध संस्था, बचाव पथके अथक प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पत्नी शैलेजा जयंत पाटील यांनीही पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

"जयंत पाटील साहेबांची बायको आम्हाला फक्त लांबून बघायला मिळाली होती. महापूर आल्यापासून मावलीच्या लेकीनं आमचं दुःख खरं उराशी धरलं, आमची आसवं पुसली, आमच्या लेकरांच्या अंगा खांद्यावरन हात फिरीवला", अशी भावना आहे तांबवे (ता.वाळवा) येथील पूरग्रस्त महिलांची.

पूरग्रस्तांना मदत करणारे अनेक हात उभे राहत आहेत. पण या हातापेक्षा एका महिलेचा हात गेले चार दिवस सर्वांना आधार देतोय. तो हात म्हणजे शैलाजा जयंत पाटील यांचा. साताऱ्यापासून सांगलीपर्यंत महापुराचे थैमान सुरू आहे. गेले चार दिवस त्या स्वतः जेवण तयार करून, आपली माणुसकीची टीम राबवून अनेकांना मदत करतांना दिसत आहेत.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमधून  शैलेजा पाटील पुराचा फटका बसलेल्या नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्था करत आहेत. त्यासाठी त्यांनी खुद्द स्वयंपाकगृहाची सुत्रे हाती घेतली आहेत. वाळवा तालुक्यातील पूरग्रस्त महामार्गावर ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या ट्रकमध्ये शेकडो लोक अडकून पडले आहेत. त्यांना जेवण पोहचविण्यासाठी इस्लामपूरमध्ये अनेक घरात मोठ्या प्रमाणात स्वयंपाक तयार करण्याचे काम सुरू आहे. शैलजा पाटील यांनी नियोजन केल्यामुळे दिवसभरात वाळवा तालुक्यातील पुरग्रस्थ गावात ५३०० लोकांचे जेवणाचे पाकीट बनवून पाठविण्यात आले. तसेच वाघवाडी ते मालखेड या पुणे-बंगळुरू हायवेवर चक्काजाम झालेल्या ८०० वाहनधारकांना जेवणाचे पाकीट वाटप करण्यात आले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात विविध पक्षांच्या यात्रा सुरू आहेत. भाजपची महाजनादेश, शिवसेनेची जनआशीर्वाद तर राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सुरू आहेत. यावरून राजकीय पक्षांवर टीका होत आहे. परंतु, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पत्नी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी धावल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shailaja jayant patil cooked food for flood affected people