'राज्यातील 240 जागांवर कॉंग्रेससोबत एकमत'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेससोबत 240 जागांवर एकमत झाले. उर्वरित 48 जागांबाबत चर्चा सुरू असून, त्यावर चार दिवसांत तोडगा निघेल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी सांगितले.

पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेससोबत 240 जागांवर एकमत झाले. उर्वरित 48 जागांबाबत चर्चा सुरू असून, त्यावर चार दिवसांत तोडगा निघेल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी सांगितले. कोणीही पक्ष सोडला, तरी नव्या पिढीला घेऊन निवडणुका लढविणार असल्याचे पवार यांनी सांगितले. 

आगामी निवडणुका, पक्षांतर आणि भविष्यातील राष्ट्रवादीचे धोरण याबाबत पवार यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. दोन्ही कॉंग्रेस आणि आघाडीतील अन्य घटक पक्षांच्या जागावाटपासंदर्भात कोणताही वाद नाही. सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. 

पवार म्हणाले, ""आघाडी मजबूत करण्यासाठी त्या-त्या पातळ्यांवर चर्चा होत आहेत. वंचितच्या आघाडी प्रवेशाबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. परंतु, कॉंग्रेससोबत सूत्रानुसार जागावाटप होईल. कोणी किती जागा लढवायच्या याबाबत पक्ष आपापली भूमिका मांडू शकतात. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्व चांगले आहे. त्यांच्याकडून समन्वयाची भूमिका आहे. त्यामुळे योग्य आणि वेळेत जागांचे वाटप होईल.'' 

दरम्यान, इंदापूर विधानसभा मतदारसंघ आपल्याकडेच ठेवण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. त्याबाबत विचारले असता, "विद्यमान आमदार असलेल्या जागा त्या-त्या पक्षांकडे असतील. मात्र, काही जागांबाबत फेरविचार होईल, असे पवार यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 240 seats were united with Congress in state says sharad pawar