बारामतीत उद्या मराठा समाजाचा एल्गार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

बारामती - सकल मराठा समाजाच्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या निमित्ताने उद्या (ता. २९) बारामतीतही मोठी गर्दी होण्याची शक्‍यता आहे. बारामतीसह आसपासच्या इंदापूर, दौंड, पुरंदर, फलटण तालुक्‍याच्या काही भागांतून मराठा बांधव बारामतीतील मोर्चात सहभागी होणार आहे. 

बारामती - सकल मराठा समाजाच्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या निमित्ताने उद्या (ता. २९) बारामतीतही मोठी गर्दी होण्याची शक्‍यता आहे. बारामतीसह आसपासच्या इंदापूर, दौंड, पुरंदर, फलटण तालुक्‍याच्या काही भागांतून मराठा बांधव बारामतीतील मोर्चात सहभागी होणार आहे. 

सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या महिन्यापासून बारामतीतील मोर्चाची तयारी सुरू केली असल्याने पुण्यापाठोपाठ जिल्ह्यातील तालुकास्तरावरील हा मोर्चाही प्रचंड संख्येचा होईल, अशी शक्‍यता व्यक्त केली जात आहे. या पूर्वी वालचंदनगर (ता. इंदापूर) येथे मराठा मोर्चा झाला आहे; मात्र बारामतीचे राजकीय व सामाजिक स्थान लक्षात घेता जिल्ह्याच्या भागातून या मोर्चासाठी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची चिन्हे आहेत. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी मराठा संघटना, तसेच पदाधिकाऱ्यांनी, महिला व युवतींनीही स्वयंस्फूर्तीने बारामती, इंदापूर तालुक्‍यातील गावोगावी बैठका घेतल्या आहेत. 

बारामतीच्या मोर्चाची पूर्वतयारी म्हणून पुण्याच्या मोर्चाकडे पाहिले जात होते; मात्र याही मोर्चासाठी इंदापूर, बारामती, पुरंदर व दौंडमधून मोठ्या संख्येने तरुणांनी व युवती, ज्येष्ठ नागरिक व महिलांनी उपस्थिती दाखविली. त्यामुळे गर्दीचा उच्चांक बारामतीतही होण्याचा आयोजकांना विश्वास आहे. ही गर्दी होईल, या शक्‍यतेने मोर्चाच्या सांगतेचे ठिकाण आयोजकांनी बदलून तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाशेजारील मिशन हायस्कूलचे मैदान येथे सांगता करण्याचा निर्णय घेतला.  

बारामतीत यापूर्वीचे विविध संघटनांनी आयोजित केलेले मोर्चे विक्रमी संख्येचे झाले आहेत. या पूर्वी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ऊस दरासाठी केलेल्या आंदोलना वेळीही बारामतीत मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर धनगर समाज आरक्षणासाठीही राज्यभरातून आलेल्या धनगर बांधवांनीही बारामतीत गर्दीचा विक्रम केला होता. बारामतीचे राज्याच्या व देशाच्या राजकारणातील स्थान लक्षात घेता येथील मोर्चा यशस्वी करण्यासाठी आजवर संघटनांनी गर्दी जमवली होती. सध्या राज्यात सुरू असलेल्या मराठा मोर्चांना स्वयंस्फूर्तीने होत असलेल्या गर्दीचे आकडे लक्षात घेता बारामतीतही लाखांचे आकडे हा मोर्चा गाठेल, असा अंदाज प्रशासनातही व्यक्त केला जात आहे.

Web Title: Baramati tomorrow to elect the Maratha community