राज्यात उष्माघाताचे तीन मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

पुणे : उन्हाळ्याच्या सुरवातीला उष्माघाताने तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून, सहा रुग्णांच्या मृत्यूमागेही हेच कारण असावे, असा संशय आरोग्य खात्याकडून व्यक्त करण्यात आला. उष्माघाताचे मृत्यू रोखण्यासाठी राज्यातील सरकारी रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अत्यावश्‍यक औषधे आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचाही विश्‍वास खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

पुणे : उन्हाळ्याच्या सुरवातीला उष्माघाताने तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून, सहा रुग्णांच्या मृत्यूमागेही हेच कारण असावे, असा संशय आरोग्य खात्याकडून व्यक्त करण्यात आला. उष्माघाताचे मृत्यू रोखण्यासाठी राज्यातील सरकारी रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अत्यावश्‍यक औषधे आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचाही विश्‍वास खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

राज्यातील बहुतांश भागांमध्ये कमाल तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढला आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढत आहे. राज्यात आतापर्यंत उष्माघाताने आठ जणांचा मृत्यू झाला, असा संशय होता. औरंगाबाद, जालना, जळगाव, बीड, यवतमाळ आणि सोलापूर या जिल्ह्यांमधून या उष्माघाताच्या संशयित मृत्यूंची नोंद झाली होती. त्यापैकी तीन रुग्णांच्या मृत्यूमागे उष्माघात हेच कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच आणखी एका जणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या संशयित उष्माघाताच्या मृतांची संख्या सहा झाली असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. 

राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, ''राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून उष्माघाताने मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची माहिती घेतली जात आहे. त्यापैकी तीन रुग्णांचा मृत्यू हा उष्माघातानेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे.'' 

उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका लक्षात घेऊन त्यावरच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. राज्यातील जिल्हा रुग्णालयांतील चार आणि ग्रामीण रुग्णालयांतील दोन खाटा उष्माघाताच्या रुग्णांवरील उपचारासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. उष्माघाताच्या रुग्णांवर उपचारासाठी अत्यावश्‍यक औषधांबरोबरच रुग्णालयातील पंखे किंवा वातानुकूतील यंत्रणा सज्ज ठेवावी. प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णाला प्रथमोपचार करून तातडीने 108 या रुग्णवाहिकेतून जवळच्या मोठ्या सरकारी रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

उन्हात सातत्याने काम केल्याने किंवा फिरल्याने उष्माघात होण्याचा धोका असतो. त्यामुळे आलेल्या रुग्णाच्या शरीराचे तापमान कमी करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासाठी पंखे, कुलर किंवा वातानुकूलित यंत्रणा यांचा वापर करावा. रुग्णाचे शरीर गार पाण्याने पुसून घ्यावे, अशा सूचना दिल्या आहेत. प्रत्येक तालुक्‍यातील एका सरकारी रुग्णालयात उष्माघातावर उपचार करता येतील, अशी व्यवस्था उभारण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

उष्माघात कसा होतो? 
रणरणत्या उन्हात सलग काही तास काम केल्याने उष्माघाताचा धोका वाढतो. वातावरणातील तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने शरीराचे तापमानही वाढते. त्यातून उष्माघात होण्याचा धोका असतो. 

सामान्य लक्षणे 
थकवा येणे, घशाला कोरड पडणे, धाप लागणे, उलट्या, भोवळ येणे.

Web Title: Heat wave to intensify in Maharashtra; three deaths due to sun stroke