मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात शुक्रवारपर्यंत मुसळधार!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार असून, मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. पश्‍चिम-मध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. ते सोमालिया किनारपट्टीकडे सरकले आहे. परंतु पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील 'महा' चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढली आहे. सोमवारी ते गुजरात किनारपट्टीच्या दिशेने सरकले आहे. त्यामुळे मंगळवारी (ता. 5) अंदमान निकोबार बेट आणि केरळ राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्‍यता आहे.

पुणे : राज्यात परतीचा पाऊस जाण्याची चिन्हे अद्याप दिसून येत नाहीत. जोरदार पावसामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान होत असून, राज्यात ओला दुष्काळसदृश्‍य स्थिती निर्माण झाली आहे. त्यात पुन्हा शुक्रवारपर्यंत (ता. 8) मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस होईल, असा इशारा हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार असून, मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. पश्‍चिम-मध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. ते सोमालिया किनारपट्टीकडे सरकले आहे. परंतु पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील 'महा' चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढली आहे. सोमवारी ते गुजरात किनारपट्टीच्या दिशेने सरकले आहे. त्यामुळे मंगळवारी (ता. 5) अंदमान निकोबार बेट आणि केरळ राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. बुधवारी (ता. 6) गुजरात आणि अंदमान-निकोबार भागात अतिवृष्टी तर नाशिक, धुळे, नंदुरबारसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी (ता. 7) गुजरातच्या काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्‍यता आहे. तसेच, जम्मू-काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेशच्या पश्‍चिम भागात, हरियाणा आणि अंदमान-निकोबार परिसरात मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. तसेच, शुक्रवारी (ता. 8) दक्षिण कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि मध्य प्रदेशच्या तुरळक भागात जोरदार पावसाची शक्‍यता हवामानशास्त्र विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

पुण्यातही शुक्रवारपर्यंत बरसणार
पुणे शहर आणि परिसरात येत्या शुक्रवारपर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्‍यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. या कालावधीत कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान 19 अंश सेल्सिअस राहील. शनिवारी (ता. 9) आकाश मुख्यत: निरभ्र राहील, असा अंदाज आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains till Friday in Marathwada with central Maharashtra