पुणे हेच दुचाकी रुग्णवाहिकेचे जनक 

योगिराज प्रभुणे
रविवार, 6 ऑगस्ट 2017

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईमध्ये दुचाकी रुग्णवाहिकेचा पथदर्शी प्रकल्प नुकताच सुरू झाला. याची प्रत्यक्षात सुरवात 2004 मध्ये पुण्यात झाली. त्यामुळे पुणे हेच दुचाकी रुग्णवाहिकेचे जनक असल्याचे यातून अधोरेखित होते. वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये अरुंद रस्ते, जागोजागी झालेली वाहतूक कोंडी यातून मार्ग काढून रुग्णापर्यंत पोचण्यातील आव्हान दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी दुचाकी रुग्णवाहिका हा प्रभावी मार्ग असल्याने हा प्रयोग करण्यात येत आहे. 

राज्यातील प्रत्येक अत्यावश्‍यक रुग्णाला तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी 'इएमएस' ही सुविधा उपलब्ध 2014 मध्ये करून देण्यात आले. राज्यात आरोग्य खात्यातर्फे 'भारत विकास ग्रुप'च्या (बीव्हीजी) वतीने ही सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. अपघात, घातपात किंवा नैसर्गिक आपत्ती अशा प्रकारच्या कोणत्याही तातडीच्या वैद्यकीय सेवेत '108' ही आपत्कालीन वैद्यकीय सेवेने तत्काळ प्रतिसाद दिल्याचे चित्र दिसते. याचा पुढचा टप्पा म्हणून दुचाकी रुग्णवाहिकेचे मुंबईत उद्‌घाटन झाले. त्या वेळी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. 

'इएमएस'ने तीन वर्षांमध्ये राज्यात वैद्यकीय सेवेचे जाळे विणले आहे. 'इएमएस'ने 31 जुलैपर्यंत राज्यात 17 लाख रुग्णांना तातडीने वैद्यकीय उपचार दिले आहेत. या दरम्यान 15 हजार 863 प्रसूती रुग्णवाहिकांमधून झाल्या आहेत. यावरूनच या सेवेचे महत्त्व अधोरेखित होते, असा निष्कर्ष गेल्या तीन वर्षांमध्ये 'इएमएस'च्या 'कॉल सेंटर'ला आलेल्या दूरध्वनीच्या विश्‍लेषणावरून काढण्यात आला आहे. 

देशात आपत्कालीन वैद्यकीय सेवेची सुरवात पुण्यातून झाली आहे. त्यासाठी शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांनी एकत्र येऊन ही वैद्यकीय सेवा पुणेकरांसाठी उपलब्ध करण्यात आली. त्याच टप्प्यावर 105 या दूरध्वनी क्रमांकावर पुणे आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू केली. त्यामुळे दुचाकीवरील रुग्णवाहिकेचा पहिला प्रयोग पुण्यात झाल्याची ठळक नोंद वैद्यकीय इतिहासात झाली आहे. त्याचे उद्‌घाटन गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या हस्ते 2004 मध्ये करण्यात आले होते. त्या वेळी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर, सध्याच्या 108 या आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे चिफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. ज्ञानेश्‍वर शेळके आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे प्रणेते डॉ. प्रसाद राजहंस यांच्या उपस्थितीत या सेवेची सुरवात झाली होती. 

दुचाकी रुग्णवाहिका 
शहरातील कोणत्याही भागात झालेल्या अपघात असो की अचानक आलेला हृदय विकाराचा किंवा अर्धांगवायूचा झटका या प्रत्येक घटनेत तातडीने प्रभावी वैद्यकीय सेवा मिळणे आवश्‍यक असते. शहरातील बहुतांश भागातील रस्त्यांवर जागोजागी असलेली वाहतूक कोंडी, रुग्णवाहिका पोचू न शकणाऱ्या जागा, अशा वेळी उपयुक्त ठरतात त्या दुचाकी. त्यातून दुचाकी रुग्णवाहिका ही संकल्पना 2004 मध्ये पुण्यात उदयास आली. कालांतराने प्रशासकीय अडथळ्यांमुळे त्याचा वापर कमी होत गेला. पण, त्याची गरज त्याच वेळी पुण्याने ठळकपणे नोंदली होती, अशी माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. 

''रुग्णाला तातडीने उपचार करता यावे, यासाठी स्कूटर रुग्णवाहिका सुरू करण्यात आली. त्यावर डॉक्‍टर आणि पॅरामेडिकल असे दोन जण जात असतं. आपल्याकडे गणपती, पालखी, सभा, मिरवणुका, वाहतूक कोंडी यातून मार्ग काढताना रुग्णवाहिकेला वेळ लागतो. त्यामुळे दुचाकीवरील रुग्णवाहिकेचा नवा प्रयोग त्या वेळी केला होता. लंडनमध्येही याच धर्तीवर सायकल ऍब्ल्यूलन्स ही संकल्पना आहे,'' 
- डॉ. प्रसाद राजहंस, आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे प्रणेते. 

''छातीत अचानक दुखणे, अर्धांगवायूचा झटका यात तातडीची वैद्यकीय मदत मिळणे आवश्‍यक असते. अशा रुग्णांपर्यंत तातडीने पोचून त्यांना सुरवातीचे वैद्यकीय उपचार प्रभावीपणे करणे, हे दुचाकी रुग्णवाहिकेतून जलदगतीने करता येईल. पुण्या-मुंबईसारख्या शहरांमधील वाहतूक कोंडी हा वैद्यकीय उपचार तातडीने मिळण्यातील सर्वांत मोठा अडथळा ठरत आहे. तसेच, ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये रुग्णवाहिका घटनास्थळापर्यंत पोचण्यासाठी रस्त्याची उपलब्धता, हे एक आव्हान असते. अशा वेळी दुचाकी रुग्णवाहिकांची मदत होईल. दुचाकी रुग्णवाहिका या मुख्य रुग्णवाहिकांसाठी पूरक अशा आहेत. आपत्कालीन स्थितीत रुग्णाला कमी वेळेत योग्य वैद्यकीय मदत मिळणे महत्त्वाचे असते,'' 
- डॉ. ज्ञानेश्‍वर शेळके, सीओओ, बीव्हीजी महाराष्ट्र, आपत्कालीन वैद्यकीय सेवा.

Web Title: marathi news marathi website Two wheeler ambulance Pune Medical Yogiraj Prabhune