Video:‘एकच वादा अजितदादा’ घोषणेने बारामतीत मुख्यमंत्र्यांचे स्वागत

Video:‘एकच वादा अजितदादा’ घोषणेने बारामतीत मुख्यमंत्र्यांचे स्वागत

बारामती : भाजपची महाजनादेश यात्रा आज पुणे जिल्ह्यात होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातही महाजनादेश यात्रा पोहोचली होती. त्यावेळी बारामतीमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विरोधी घोषणा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले.

‘एकच वादा अजितदादा’
बारामती शहरातील पेन्सिल चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘एकच वादा अजितदादा’  अशा घोषणा देत मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. बारामतीतील पेन्सिल चौकात भिगवणहून मुख्यमंत्र्यांची जनादेश यात्रा आल्यानंतर उपस्थित पोलिसांना न जुमानता राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी ‘एकच वादा अजितदादा’ अशी घोषणा देण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांनी या कार्यकर्त्यांनाही अभिवादन केले व तेथून मुख्यमंत्र्यांचा ताफा वेगाने बारामतीच्या दिशेने निघून गेला. गेल्या पाच वर्षांत सर्व आघाडयांवर अपयशी ठरल्याने मुख्यमंत्र्यांचा निषेध केल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा संपल्यानंतर त्याच ठिकाणाहून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत फेरी काढली. त्यावेळी ‘एकच वादा अजितदादा’ अशा पुन्हा घोषणा दिल्या. मुख्यमंत्री भाषण संपवून बारामती विमानतळाकडे रवाना होताच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

‘...सुन भाई चाचा आ भतीजा’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये अपेक्षेप्रमाणे शरद पवार यांना लक्ष्य केले. जम्मू-काश्मीर संदर्भातील कमल ३७० संदर्भात निर्णय घेताना, शरद पवार यांनी सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा दिला नाही, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता छत्रपतींचे वंशजच आमच्या सोबत आहेत, असं सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं. ‘बुरे कामका बुरा नतीजा सुन भाई चाचा आ भतीजा’, असे म्हणत त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांना टोला लगावला. महाजनादेश यात्रेच्या रथावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री बाळा भेगडे, खासदार अमर साबळे, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटील यात लक्ष वेधून घेत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com