भारतातून तांदळाची विक्रमी निर्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

पुणे - गेल्या आर्थिक वर्षात भारतातून तांदळाची विक्रमी निर्यात झाली आहे. २०१६-१७च्या (१०७ लाख टन) तुलनेत २०१७-१८ या वर्षात १२७ लाख टन इतकी तांदळाची निर्यात झाली आहे. बांगलादेशने आयातीवर २८ टक्के शुल्क लागू केल्याने तेथील निर्यातीवर परिणाम होण्याचा अंदाज आहे. या वर्षी ५० हजार कोटी रुपये इतके परकी चलन निर्यातीतून मिळाले आहे.

निर्यातीमध्ये बिगर बासमती तांदळाचा वाटा अधिक आहे. त्याची २०१६-१७ या वर्षी ६७ लाख टन आणि २०१७-१८ या वर्षी ८७ लाख टन इतकी निर्यात झाली होती. नुकतेच केंद्र सरकारने तांदळाच्या आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ केली आहे. प्रतिक्विंटल १५० ते २०० रुपये इतकी वाढ असून, त्यामुळे निर्यात होणाऱ्या तांदळाच्या भावातही वाढ होईल. बांगलादेशने तांदळाच्या आयात शुल्कात वाढ केली आहे. यामुळे तेथील निर्यातीवर परिणाम होण्याचा अंदाज व्यापारी राजेश शहा यांनी व्यक्त केला आहे. 

थायलंड, व्हिएतनाम हे जगात तांदळाची सर्वाधिक निर्यात करणारे देश आहेत. या देशांच्या तुलनेत भारतातील बिगर बासमती तांदळाचे भाव कमी असल्याने नेपाळ, बांगलादेशातून या तांदळाला मागणी असते. अमेरिका आणि युरोपियन देशांतूनही बिगर बासमती तांदळाला चांगली मागणी असते. आधारभूत किमतीत वाढीचे परिणाम आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव यावर तांदळाची निर्यात अवलंबून असेल, असे त्यांनी नमूद केले.

 इराणने आयात वाढवली 
बासमती तांदळाची निर्यात प्रामुख्याने आखाती देशांत केली जाते. इराण, इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती या देशांपैकी इराणने या वर्षी बासमती तांदळाची आयात वाढवली आहे. युरोपियन देश आणि अमेरिकेतून बासमती तांदळाची मागणी तुलनेत कमी होत आहे.  

Web Title: Rice export record from India