पवार यांचा प्रशंसक असल्याचा अभिमान- पंतप्रधान मोदी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

येत्या फेब्रुवारी महिन्यात लोकप्रतिनिधी म्हणून पवार यांच्या कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांची ही वाटचाल उत्कृष्ट आहे. त्यांना आदर्श मानणाऱ्या अनेक लोकांपैकी मी एक आहे ही गोष्ट जाहीरपणे मान्य करताना मला अभिमान वाटतो, असे मोदी यांनी सांगितले. 

मांजरी (पुणे) - सार्वजनिक जीवनात जगताना नीती मूल्यांचा फार समतोल पाळावा लागतो. शरद पवार यांनी मागील 50 वर्षांपासून अव्याहतपणे (विदाऊट ब्रेक) सार्वजनिक जीवनात हा समतोल साधून आदर्शवत वाटचाल केली आहे. देशात असा क्वचितच दुसरा नेता असेल. मी त्यांचा प्रशंसक आहे हे जाहीरपणे सांगताना मला अभिमान वाटतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 

मांजरी येथील वसंतदादा शुगर इंस्टिट्यूट येथे आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर नेते उपस्थित होते.

मोदी म्हणाले, "सार्वजनिक जीवन कसे जगायचे याचे उत्तम उदाहरण शरद पवार यांनी घालून दिले आहे. माझ्या सुरवातीच्या काळात मला बोटाला धरून त्यांनी चालायला शिकवले.."
दिवसभरात राजकीय जीवनात कितीही उलथापालथ होवो, शेतीविषयीचा प्रश्न असेल तर शरद पवार हे त्यासाठी खास बसून वेळ देतात, आणि प्रश्न मार्गीच लावतात. शेतीच्या विषयातील त्यांचे समर्पण मी पाहिले आहे. ते वाखाणण्याजोगे आहे. 

येत्या फेब्रुवारी महिन्यात लोकप्रतिनिधी म्हणून पवार यांच्या कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांची ही वाटचाल उत्कृष्ट आहे. त्यांना आदर्श मानणाऱ्या अनेक लोकांपैकी मी एक आहे ही गोष्ट जाहीरपणे मान्य करताना मला अभिमान वाटतो, असे मोदी यांनी सांगितले. 
 

Web Title: sharad pawar is a roll model- PM Narendra Modi