नाशिकमध्ये 500 कोटींच्या 'ड्रायपोर्ट'ची करणार उभारणी : नितीन गडकरी

महेंद्र महाजन : सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

'सकाळ'वर व्यक्त केला विश्‍वास

सामाजिक दायित्वाबद्दल "सकाळ माध्यम समूहा'चे कौतुक करायला हवे, असा आवर्जून उल्लेख श्री. गडकरी यांनी आपल्या भाषणात केला. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करणाऱ्यांमध्ये देशात "सकाळ' अग्रस्थानी आहे. "सकाळ-ऍग्रोवन' हे दैनिक मी नियमित वाचतो. त्यातून शेतीविषयक शास्त्रीय माहिती मिळते. नाविन्यता, गुणवत्ता, संशोधन, सिंचन, "लॉजिस्टीक कॉस्ट' कमी करणे, उत्तम पॅकेजिंग, प्रक्रिया उद्योग उभारणी यातून कृषी क्षेत्राला समृद्धीचे दिवस येतील. त्यासाठी "सकाळ' ने पुढाकार घ्यावा असे आपणाला वाटते, असेही श्री. गडकरी म्हणाले.

नितीन गडकरी : राष्ट्रीय फलोत्पादन महापरिषदेचे शानदार उद्‌घाटन

नाशिक - कांदा, डाळिंब, द्राक्षे, भाजीपाल्यासह शेतमालाच्या निर्यातीची सुविधा करण्यासाठी जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून नाशिकमध्ये "ड्रायपोर्ट'ची उभारणी केली जाईल. त्यासाठी जालना, वर्धाप्रमाणे इथेही पाचशे कोटींची गुंतवणूक केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केली. राज्याचे सिंचनाचे क्षेत्र 18 टक्‍क्‍यांवरुन 60 टक्‍क्‍यांपर्यंत नेण्यासाठी सरकारने सिंचनाचे "बजेट' 50 हजार कोटींपर्यंत नेल्याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

"सकाळ-ऍग्रोवन' आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या दोन दिवसीय दुसऱ्या राष्ट्रीय फलोत्पादन महापरिषदेचे शानदार उद्‌घाटन श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. "सकाळ माध्यम समूहा'चे अध्यक्ष प्रतापराव पवार, कृषी व फलोत्पादन मंत्री भाऊसाहेब फुंडकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, महापौर अशोक मुर्तडक, "सकाळ माध्यम समूहा'चे मुख्य संपादक श्रीराम पवार, मुक्त विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, आमदार प्रा. देवयानी फरांदे आदी उपस्थित होते.

'लॉजिस्टीक कॉस्ट' होईल कमी
उत्पादनासह शेतीमालाला चांगले पैसे मिळावेत म्हणून "लॉजिस्टीक कॉस्ट' हा महत्वाचा विषय आहे, असे सांगून श्री. गडकरी म्हणाले, की चीनमध्ये 8 ते 10, युरोपियन राष्ट्रांमध्ये 12, तर भारतात "लॉजिस्टीक कॉस्ट' 18 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. आपला हा खर्च 8 ते 10 टक्‍क्‍यांपर्यंत कमी करण्यातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धा करणे शक्‍य होणार आहे. त्यादृष्टीने नाशिकचे "ड्रायपोर्ट' महत्वाची भूमिका बजावणार आहे. या "ड्रायपोर्ट'साठी तीन जागांचे प्रस्ताव पुढे आले आहेत. याशिवाय रस्ते आणि रेल्वेपेक्षाही जलवाहतूक स्वस्त आहे. प्रवासी आणि मालवाहतुकीचे चीनमध्ये 47, जपान-कोरियामध्ये 44, युरोपियन राष्ट्रांमध्ये 40 टक्के इतके प्रमाण आहे. भारतामध्ये हेच प्रमाण 5.6 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. हीच बाब लक्षात घेऊन देशातील 111 नद्यांचे जलमार्गात रुपांतरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गंगेमध्ये त्यासंबंधीचे काम सुरु झाले आहे. वाराणसी ते साहीबगंज अशा 1 हजार 680 किलोमीटर जलमार्गाची उभारणी करत 45 "वॉटरपोर्ट' बांधण्यात येणार आहेत. आपल्या फलोत्पादनादृष्टीने साहीबगंज महत्वाचे ठरणार आहे.

'ब्रीज कम बंधारे'ला द्या चालना
देशातंर्गतच्या महामार्ग उभारणीत "ब्रीज कम बंधारा' उभारण्याची संकल्पना राबवण्याचे ठरवले. तेंव्हा वित्त विभागाने हरकत घेत "आंधळे दळतयं अन्‌ कुत्रे पीठ खातयं' याची प्रचिती दिली. खरे म्हणजे, सरकार असेच चालते, असे सांगत श्री. गडकरी यांनी "ब्रीज कम बंधारे' बांधण्याची मागणी माझ्याकडे आणि पंतप्रधानांकडे करावी, असे श्री. फुंडकर आणि श्री. खोत यांना सूचवले.

द्राक्षांच्या आधुनिक वाणाचे धोरण
राज्यात 18 लाख हेक्‍टर फळबागांची वाढ झाली आहे. याच पार्श्‍वभूमीवर तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी ही महापरिषद होत असल्याचा आनंद आहे, असे गौरवोद्‌गार काढून श्री. फुंडकर म्हणाले, की यापुढील काळात हवामानावर आधारित शेती करावी लागणार आहे. कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारे वाण वापरावे लागतील. कीड-रोडमुक्त फळबागा व्हावेत यादृष्टीने संशोधन सुरु आहे. याशिवाय द्राक्ष निर्यातीत राज्य "नंबर-वन' असून नाशिक जिल्ह्यातून 90 टक्के निर्यात होते. म्हणूनच राज्यातील द्राक्षे जगात प्रसिद्ध व्हावेत यासाठी आधुनिक वाण आणण्याचे धोरण आखले जाईल. याशिवाय कांदा चाळी उभारणीचे प्रलंबित असलेले मागील अनुदानाचे देणे येत्या आठ दिवसांमध्ये मार्गी लावण्याचा निर्णय घेतला जाईल.

'सकाळ'ची समाजोपयोगी पत्रकारिता
"सकाळ'तर्फे समाजोपयोगी पत्रकारिता करण्यात येत आहे. लोकांच्या प्रबोधनावर भर देत असतानाच आवश्‍यक ठिकाणी टीका करण्यासह लोकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांना मदत केली जाते. "स्मार्ट व्हिलेज' ही संकल्पना राबवण्यात येत असून त्यातून राज्याला नवी दिशा मिळणार आहे. खरे म्हणजे, शेतकऱ्यांनी आपले प्रश्‍न सोडवण्यासाठी स्वतः प्रयत्न करावा. सरकार पायाभूत सुविधा देऊन प्रगतीचा वेग वाढवू शकेल. "सकाळ-ऍग्रोवन'तर्फे समाजाची सेवा केली जात आहे. शेतकऱ्यांचे भले होण्यासाठी सरकार, संस्था, संघटनांचे सहकार्य घेतले जात आहे. "सकाळ रिलीफ फंड' आणि तनिष्का भगिनींच्या माध्यमातून 350 गावे टंचाईमुक्त करण्यात यश मिळाले आहे. लोकांच्या सहभागातून लोकांचे कल्याण ही भूमिका त्यामागील आहे, असे श्री. पवार यांनी सांगितले.

मुक्त बाजारपेठ उपलब्ध
शेतीमध्ये सुधारणा होत असतानाच शेतकऱ्यांनी फलोत्पादनात आघाडी घेतली आहे. सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीचा निर्णय घेत मुक्त बाजारपेठ उपलब्ध करुन दिली आहे. फळ-भाजीपाला नियमनमुक्त केले आहे. संत शिरोमणी सावतामाळी अभियान सुरु करत बांधावरचा माल मंत्रालयाच्या दारात नेला आहे. सध्याच्या शेतीपुढील असलेल्या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत बाजारपेठेचे तंत्रज्ञान पोचायला हवे, असे श्री. खोत यांनी स्पष्ट केले.

हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करावा लागला आहे, असे सांगून श्री. माने म्हणाले, की सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार काढणी पश्‍चात शेतमालाचे 92 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. त्यात फलोत्पादन क्षेत्रातील 40 हजार कोटींच्या नुकसानीचा समावेश आहे. म्हणूनच हवामान बदल आणि काढणी पश्‍चात नुकसान यावर महापरिषदेत विशेष भर देण्यात आला आहे.

कुलगुरु, कुलसचिव, महापौर, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे विभागीय अध्यक्ष माणिकराव पाटील, डाळिंब उत्पादक संघाचे प्रा. प्रमोद पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. मनोज गोविंदवार यांनी सूत्रसंचालन केले. मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान विद्याशाखेचे संचालक डॉ. सूर्या गुंजाळ यांनी आभार मानले.

काय म्हणाले गडकरी?

 • पाणी उपलब्धतेच्या नव्हे, तर नियोजनाच्या कमतरतेमुळे पाण्याची समस्या सुटू शकलेली नाही
 • जलयुक्त शिवार अभियानाचे काम चांगले सुरु आहे. त्यास जमीनशास्त्राची जोड द्यावी लागेल
 • "सॉफ्ट-स्ट्राटा' लागेपर्यंत पाणी मुरवण्यासाठी खालीपर्यंत जावे लागेल
 • शेताच्या बाहेर पाणी जाणार नाही असा संकल्प करावा
 • सिंचनासाठी केंद्राचे 85 हजार कोटींचे 138 प्रकल्प असून त्यात महाराष्ट्रातील 36 हजार कोटींच्या 29 प्रकल्पांचा समावेश आहे
 • ठिबक सिंचनाचे अनुदान देण्यास विलंब होतो आणि पुन्हा "लक्ष्मीदर्शन' केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत. त्यावर उपाय म्हणून राष्ट्रीयकृत बॅंकेतर्फे ठिंबक सिंचन संच देऊन सरकारने पाच वर्षे बॅंकेचे व्याज द्यावे
 • राज्य सरकारने 5 हजार कोटींची गुंतवणूक करत 5 लाख वीजपंप कनेक्‍शन दिले. काही दिवसांमध्ये 15 दिवसांमध्ये कनेक्‍शन देण्याची व्यवस्था सरकार करत आहे
 • पुस्तकी अर्थशास्त्रावर देश चालत नाही. त्यामुळे समाजवाद, साम्यवाद, पुंजीवाद ढासळला आहे. म्हणूनच गरीब, शेतकरी, शेतमजूर यांना केंद्रबिंदू मानून व्यावहारिकदृष्ट्या आर्थिक धोरण आखायला हवे.
 • दुबई, कतारमध्ये अन्नसुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला असल्याने आपल्याला तिथे निर्यातीची मोठी संधी आहे
 • वीज, पाणी, रस्ते, दळवळणाची साधने ही सरकारची जबाबदारी असून संशोधन हे सगळ्यात महत्वाचे आहे
 • यंदा डाळींचे उत्पादन वाढल्याने 15 लाख टन डाळींच्या आयातीची गरज नसल्याची बाब पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोचवली
 • 1 लाख 60 हजार कोटींचे खाद्यतेलाची आयात करावी लागत असल्याने पीक पद्धतीत बदल करुन कांद्याऐवजी सूर्यफूल, सोयाबीन, भूईमुगाची लागवड करायला हवी
 • चीनमध्ये कोळश्‍यापासून युरिआची निर्मिती केली जाते. आपल्याकडे कोळसा उपलब्ध असल्याने युरिआची आयात बंद करुन युरिआची निर्मिती सुरु करावी. भद्रावतीमध्ये त्यासाठी 6 हजार कोटींच्या गुंतवणुकीसाठी जागा देण्यात आली आहे. सरकारने युरिआ खरेदी करण्याचा करावा असे मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. त्यातून पन्नास टक्के स्वस्त युरिआ शेतकऱ्यांना मिळेल
 • कृषी विद्यापीठ "पांढरी हत्ती' असल्याने संशोधनात शेतकऱ्यांनी लक्ष घालावे
 • कृषीमाल प्रक्रिया उद्योग उभारत असतानाच तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावे
 • कच्चे तेल, इंधनाचे 7 लाख कोटींची आयात होते. त्यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी पर्यायी इंधनाची निर्मिती करावी

'सकाळ'वर व्यक्त केला विश्‍वास
सामाजिक दायित्वाबद्दल "सकाळ माध्यम समूहा'चे कौतुक करायला हवे, असा आवर्जून उल्लेख श्री. गडकरी यांनी आपल्या भाषणात केला. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करणाऱ्यांमध्ये देशात "सकाळ' अग्रस्थानी आहे. "सकाळ-ऍग्रोवन' हे दैनिक मी नियमित वाचतो. त्यातून शेतीविषयक शास्त्रीय माहिती मिळते. नाविन्यता, गुणवत्ता, संशोधन, सिंचन, "लॉजिस्टीक कॉस्ट' कमी करणे, उत्तम पॅकेजिंग, प्रक्रिया उद्योग उभारणी यातून कृषी क्षेत्राला समृद्धीचे दिवस येतील. त्यासाठी "सकाळ' ने पुढाकार घ्यावा असे आपणाला वाटते, असेही श्री. गडकरी म्हणाले.

सरकारी "सिस्टीम'मध्ये न गुंतण्याचा खोतांना सल्ला
सरकारी "सिस्टीम'मध्ये न गुंतण्याचा सल्ला श्री. खोत यांना श्री. गडकरी यांनी दिला. शेतकऱ्यांचे नेते तुम्ही असल्याने तुमची मदत हवीय, असे सांगत श्री. गडकरी यांनी दुग्धोत्पादन वाढवण्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर श्री. खोत यांनी स्मित हास्य केले. मग श्री. गडकरी यांनी हसू नका मी खरेच गंभीर सांगतो आहे, असेही सांगितले. याशिवाय "सदाभाऊ भावासाठी लढू नका', असे म्हणत श्री. गडकरी यांनी भाव सरकार नाही, तर मार्केट ठरवणार असल्याची आठवण करुन दिली.

Web Title: 500 crore Dryport will build in Nashik : Nitin Gadkari