सत्तेच्या घडाला ‘कमळा’चे फूल

सत्तेच्या घडाला ‘कमळा’चे फूल

जळगाव - गेल्या ३५ वर्षांपासून शिवसेना नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन गटाचे महापालिकेतील साम्राज्य जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भाजपने अखेर शुक्रवारी (३ ऑगस्ट) खालसा केले. या निवडणुकीत महाजन यांच्या नेतृत्वाखालील भाजपने ५७ जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व मिळविले. जैन यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला अवघ्या १२ व ३ पुरस्कृत अशा १५ जागाच मिळू शकल्या. काँग्रेस- राष्ट्रवादी- समाजवादी पक्ष आघाडीचा अक्षरश: धुव्वा उडाला. त्यांना खातेही उघडता आले नाही. ‘एमआयएम’ने तीन जागांवर विजयी होत प्रस्थापित पक्षांना इशारा दिला. 

दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्ताने सुरेशदादा जैन यांच्या वर्चस्वाविरुद्ध संघर्ष करणाऱ्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांना जे गेल्या तीन दशकांत जमले नाही, ती ‘जादू’ मंत्री गिरीश महाजन यांनी करून दाखवली, तर अस्तित्वासाठी सुरू असलेला जैन यांचा संघर्ष अखेर अयशस्वी ठरला. 

महाजनांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब 
महापालिका निवडणुकीची सूत्रे या वेळी प्रथमच भाजपच्या वतीने खडसे यांच्याऐवजी मंत्री महाजन यांच्याकडे आली. गेल्या महिनाभरापासून उमेदवारांच्या निवडीपासून प्रचाराची यंत्रणा राबविण्यापर्यंत सर्व नियोजन महाजन यांच्याकडे होते. जळगाव महापालिका ताब्यात घेऊन महाजन यांना जिल्ह्यावरील नेतृत्व सिद्ध करायचे होते आणि या निकालातून ते सिद्ध झाले, असे म्हणता येईल; तर जैन यांचे अस्तित्व टिकविण्यासाठीची लढाई अपुरी पडली, असेही या निवडणुकीचे वर्णन करता येईल. 

विकासाच्या राजकारणाला लोकांनी भरभरून मतदान करून भाजपला विजयी केले आहे. जे द्वेषाचे राजकारण करतात, त्यांना जनतेने चपराक दिली असून, हा आमचा ऐतिहासिक विजय आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आपले खातेही उघडू शकलेली नाही. 
- गिरीश महाजन, जलसंपदामंत्री 

महापालिकेत भाजपने पूर्ण बहुमत मिळविले असून, त्याबद्दल भाजपसह गिरीश महाजनांचे अभिनंदन. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेची व व्यक्तिश: माझी भूमिका सहकार्याची राहील. तसेच सामाजिक सलोखा व सौहार्द टिकून राहण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील राहू.
- सुरेशदादा जैन, शिवसेना नेते

स्वबळावर लढण्याने यश : खडसे
पालिकेतील ज्या प्रवृत्तींविरोधात ३० वर्षे संघर्ष केला, त्यांच्याशी युती करण्याचा सुरवातीला प्रयत्न झाला. आपण, त्याला तीव्र विरोध केला. पक्षातील बहुसंख्य कार्यकर्तेही युतीच्या विरोधात होते. त्यामुळे भाजपने ही निवडणूक पूर्ण शक्तिनिशी स्वबळावर लढली, असे मत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मांडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com