पाणी आलं! आणि ते नाच नाच नाचले..

रोशन भामरे : सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

तिळवण (ता. बागलाण) येथील सरवर वस्तीवरील जिल्हा परिषदेचा हातपंप तीन आठवड्यांपासून नादुरुस्त होता. त्याच्या दुरुस्तीसाठी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे शालेय कर्मचाऱ्यांनी लेखी तक्रार दिली होती. तरीही हातपंपाची दुरुस्ती होत नव्हती. (ता.१६) ऑक्‍टोबरला "सकाळ'मध्ये "विद्यार्थ्यांना मिळेना पिण्याचे पाणी' हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्वरित दुसऱ्या दिवशी पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हातपंप दुरुस्त केला.

बागलाण : तिळवण (ता. बागलाण) येथील सरवर वस्तीवरील जिल्हा परिषदेचा हातपंप तीन आठवड्यांपासून नादुरुस्त होता. त्याच्या दुरुस्तीसाठी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे शालेय कर्मचाऱ्यांनी लेखी तक्रार दिली होती. तरीही हातपंपाची दुरुस्ती होत नव्हती. (ता.१६) ऑक्‍टोबरला "सकाळ'मध्ये "विद्यार्थ्यांना मिळेना पिण्याचे पाणी' हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्वरित दुसऱ्या दिवशी पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हातपंप दुरुस्त केला. 

सरवर वस्तीशाळेच्या विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी 

सरवर जिल्हा परिषद शाळेला पाणीपुरवठ्यासाठी ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत स्वतंत्र हातपंप दिला आहे. नादुरुस्त हातपंपांच्या दुरुस्तीसाठी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत स्वतंत्र पथक असताना, शाळेचा हातपंप दुरुस्तीसाठी १५ दिवसांपासून तक्रार केल्यानंतरही कार्यवाही न केल्याने विद्यार्थी, अल्प मानधनावर काम करणाऱ्या स्वयंपाकी व मदतनिसांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. त्यामुळे पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. मात्र, "सकाळ'मध्ये वृत्त येताच पंचायत समितीचा पाणीपुरवठा विभाग खडबडून जागा झाला व दुसऱ्या दिवशी नादुरुस्त हातपंप दुरुस्त करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. त्यांच्या चेहऱ्यावर हातपंप दुरुस्त झाल्याचा आनंद दिसत होता. ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थ्यांनी "सकाळ'चे आभार मानले. 

निवडणुकीमुळे दुरुस्तीला उशीर 

सुमारे सहाशे नागरिकांची सरवरवस्ती आहे. शाळेतील हातपंपावर काही कुटुंबांची तहान भागते. मात्र, हातपंप खराब झाल्याने त्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. आता हातपंपाची दुरुस्ती झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. निवडणुकीमुळे दुरुस्तीस उशीर झाल्याचे पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

पाणीपुरवठा विभागाकडून तत्काळ हातपंपाची दुरुस्ती 

हातपंप तांत्रिक अडचणीमुळे खराब झाल्याने मुलांची पाण्यासाठी गैरसोय झाली. "सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध केल्याने दुसऱ्याच दिवशी हातपंप सुरू झाला व पाण्याची समस्या दूर झाली. त्याबद्दल "सकाळ'चे आभार मानतो. - दशरथ बोरसे, पालक 

"सकाळ'मध्ये वृत्त आल्यानंतर शाळेचा हातपंप दुरुस्त झाला. आता पाण्यासाठी लांब जावे लागणार नाही. त्यामुळे आम्ही सर्व विद्यार्थी आनंदी झालो आतोत.- अश्‍विनी पवार, विद्यार्थिनी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drinking water for the students of Sarwar Residence