रब्बीबाबत 'त्यांच्या' आशा पल्लवित!

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

मालेगावातील येसगाव येथे व परिसरात यंदा प्रमाणापेक्षा जादा पाऊस पडला. त्यामुळे नदी- नाले, बंधारे, विहिरी पाण्याने भरल्या आहेत. अतिरिक्त पावसामुळे खरिपातील बाजरी, मका पिकांनी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही. मात्र आता रब्बीबाबत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मालेगाव : येसगाव येथे व परिसरात यंदा प्रमाणापेक्षा जादा पाऊस पडला. त्यामुळे नदी- नाले, बंधारे, विहिरी पाण्याने भरल्या आहेत. अतिरिक्त पावसामुळे खरिपातील बाजरी, मका पिकांनी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही. मात्र आता रब्बीबाबत आशा पल्लवित झाल्या आहेत.

विहिरींना पाणी आल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत 

अमेरिकन लष्करी अळीमुळे मका पीक वाया गेले, तर जादा पाऊस व वाऱ्यामुळे बाजरीचे पीक भुईसपाट झाले. ज्या भागात पाऊस कमी होता तेथील खरीप चांगला आहे. खरीप पिकांची काढणी सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी बाजरीचे सूड्या रचणे सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी बाजरीची काढली आहे. शेतकऱ्यांना रब्बी लागवडीचे वेध लागले आहेत. मोकळ्या शेतीत ट्रॅक्‍टरच्या साह्याने नांगरटी सुरू आहे. सर्वसाधारण शेतकरी बैलजोडीच्या साह्याने नांगरटी करीत आहेत. अनेक जण समूहाने नांगरटी करीत आहेत.

येसगावसह परिसरात रब्बी हंगामाची तयारी सुरू 

गहू, हरभराबरोबरच कांदा लावण्याकडे शेतकऱ्यांचा मोठा कल आहे. सतत पावसामुळे पावसाळी कांद्याची रोपे सडली होती. अनेक शेतकरी उन्हाळी भगव्या कांद्याचे रोप टाकण्याच्या तयारीत आहेत. मुबलक पाण्यामुळे परिसरातील पडिक विहिरींना पाणी उतरले आहे. त्यामुळे गहू, हरभरा व कांदा पिकाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्‍यता आहे. विहिरींच्या पाण्यावर हरभरा सहज येईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परिसरात अजून मक्‍याचे पीक मोठ्या प्रमाणावर उभे आहे. बाहेर गावाहून मजूर आल्याने मका काढणीस किमान तीन आठवडे लागतील. त्या जागी उन्हाळी कांद्याची लागवड होण्याची शक्‍यता आहे. खरीप हंगामापासून मजुरांना काम मिळत आहे. विधानसभा निवडणुकीमुळे मजूरटंचाई भासत आहे. परिसरात दोन ते तीन आठवड्यात रब्बीची पेरणी सुरू होण्याची शक्‍यता आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The hope of farmers getting water from the wells