भ्रमनिराश होऊन परताल तर रांगेत उभे रहावे लागेल-खा.सुप्रिया सुळे 

live
live

.नाशिक ः महाराष्ट्राच्या गंभीर प्रश्‍नांची उकल करण्याऐवजी फोडाफोडीचे राजकारण सत्ताधाऱ्यांनी चालवले आहे. अशा परिस्थितीत पक्षांतर केल्यावर भ्रमनिराश होऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये परताल, तर रांगेत उभे रहावे लागेल, अशी तंबी खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीला सोडून जाणाऱ्या नेत्यांना दिली. तसेच आगामी निवडणुकीत पक्षातर्फे कर्तृत्ववान चेहरे दिसतील, असाही निर्वाळा त्यांनी दिला. 

संवाद कार्यक्रमातंर्गत नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघ सभा आणि शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर खासदार सुळे यांनी राष्ट्रवादी भवनात पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, की पक्षात पडझड होते. त्याची सगळीकडे चर्चा होते. चाळीस वर्षे एकत्र काम केले असल्याने त्याबद्दल वाईट वाटते. पण पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी 26 वर्षे सत्तेत आणि तेवढीच वर्षे विरोधात काम केले आहे. संघर्षातून त्यांचे नेतृत्व उभे राहिले आहे.

संघटन संघर्षातून उभे राहिले आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षाला आणि विचारधारेला मरण असत नाही. निवडणुका नेते जिंकत नसतात. कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणूक जिंकता येते. त्यामुळे आता नवीन नेते तयार होतील. तसेच शरद पवार हे चोवीस तास उपलब्ध असतात. त्यांना भेटण्यासाठी वेळ घेण्याची गरज पडत नाही. सर्वजण कुटुंब म्हणून त्यांच्या संपर्कात असतात. पक्षांतर करणारे आम्हाला सांगून जातात. चौकशी, बॅंक, कारखाना अशी अडचणी सांगतात. त्यामुळे अशांबद्दल आमच्या मनात कटूता नसेल. 

डॉ. मनमोहन सिंह यांनी सावरली अर्थव्यवस्था 
तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी अर्थव्यवस्था सावरत विकासाचा गाडा रुळावर आणला. त्यामुळे आताही घसरत चाललेली अर्थव्यवस्था रुळावर आणणे शक्‍य आहे. त्यासाठी मात्र धोरणात बदल करावे लागतील. मात्र आमच्या मुख्यमंत्र्यांनी सध्याची कठीण परिस्थिती दिसत नाही. पंतप्रधान, अर्थमंत्री, वाणिज्य मंत्र्यांनी लक्ष घालावे अशी विनंती मुख्यमंत्री करत नाहीत, अशी टीका करत त्यांनी आमच्या सरकारच्या काळात एवढी मंदी कधी आली नाही, असे स्पष्ट केले. माजी खासदार समीर भुजबळ, प्रेरणा बलकवडे, कोंडाजीमामा आव्हाड, दिलीप बनकर, नानासाहेब महाले, गजानन शेलार, श्रीराम शेटे, उत्तमबाबा भालेराव, विजयश्री चुंभळे, सचिन पिंगळे, विष्णूपंत म्हैसधुणे आदी उपस्थित होते. 
... 

सुप्रिया सुळे म्हणतात..
-नाशिकमध्ये बेरोजगारी, महिंद्रा अँड महिंद्रा, एच. ए. एल., बॉश कंपन्यांना भेडसावणारी मंदी आणि एकच रस्ता अनेकदा खोदणारी स्मार्ट सिटी असे प्रश्‍न तयार झाले 
-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र लिहून -"ऍसेट'ची गरज पडल्यास विक्री करावी असे सूचवले आहे 
-रिझर्व्ह बॅंकेचा राखीव निधी विकासासाठी वापरुन अर्थव्यवस्थेला स्थिरता देण्याचा होणारा प्रयत्न चिंताजनक आहे 

-मुख्यमंत्री नोकऱ्या असल्याचे म्हणताहेत. त्यामुळे राज्यभरातील तरुणांनी माझ्याकडे व्यक्तिगत माहिती पाठवावी. मी ती मुख्यमंत्र्यांना पाठवते 
निवडणुकांचे "टाइमिंग' साधत विरोधकांच्या विरोधात अडचणी उभ्या केल्या जातात. सत्ताधारी अशा प्रकरणांमध्ये सामील असूनही त्यांना काही होत नाही 

-ईव्हीएम बद्दल झोलमाल असल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. त्यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली 
-सरकारने दडपशाही, नोटीस पाठवणे, तुरुंगात टाकणे, लाठीमार असे प्रकार थांबवावेत. विनाअनुदानित शिक्षकांवर करण्यात आलेला लाठीमार निषेधार्ह्य आहे 
-प्रदूषण कमी व्हावे म्हणून फ्रान्स, जर्मनीमध्ये युरो 6 वरुन इलेक्‍ट्रीकऐवजी हायड्रोजनचा मार्ग स्विकारण्यात आला आहे. त्याचा विचार देशात व्हावा 

""माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पक्षांतराच्या कंड्या पिकवल्या जाताहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी आज सकाळी सविस्तर बोलणे झाले. त्यांच्या मान्यतेनुसार संवाद कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला. त्यांचे पुतणे समीर भुजबळ हे दोन दिवस दौऱ्यात आहेत.'' 
- सुप्रिया सुळे (खासदार) 
... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com