शालेय पोषण आहार योजनेचे मानधन थेट स्वयंपाकीच्या खात्यावर 

प्रशांत बैरागी : सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

स्वयंपाकी महिलांना यापूर्वी दरमहा एक हजार रूपये महिना मानधन अदा केले जात होते. प्राथमिक शिक्षक संघटना यांच्या मागणीनुसार वाढत्या महागाईमुळे एप्रिल २०१९ पासून दरमहा १ हजार ५०० रुपये एवढे मानधन अदा करण्याचा निर्णय शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेला आहे. जिल्हास्तरावरून मानधन अदा करण्यासाठी वेळापत्रकच तयार करून देण्यात आले असून त्याप्रमाणे बॅंक खात्यात मानधन थेट जमा करण्याची दक्षता घ्यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

नामपूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी मान्यताप्राप्त शाळांमध्ये राबविण्यात येत असलेल्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत कार्यरत स्वयंपाकी, मदतनीस यांचे मानधन आता दरमहा दहा तारखेपर्यंत थेट त्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील स्वयंपाकी महिलांनी समाधान व्यक्त केले आहे. शालेय पोषण आहार ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. या योजनेमार्फत शाळांमधील विद्यार्थ्यांना आहार पुरविण्यात येतो. यासाठी शाळांना निधीही पुरविण्यात येत असतो. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील स्वयंपाकी, मदतनीस हे शाळांमधून पोषण आहार शिजविणे, आहार वाटप करणे, परिसर स्वच्छ करणे व इतर अनुषंगिक कामे करतात. पोषण आहार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये स्वयंपाकी, मदतनीस यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. 

जिल्हास्तरावरून मानधन अदा करण्यासाठी वेळापत्रक तयार
स्वयंपाकी महिलांना यापूर्वी दरमहा एक हजार रूपये महिना मानधन अदा केले जात होते. प्राथमिक शिक्षक संघटना यांच्या मागणीनुसार वाढत्या महागाईमुळे एप्रिल २०१९ पासून दरमहा १ हजार ५०० रुपये एवढे मानधन अदा करण्याचा निर्णय शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेला आहे. जिल्हास्तरावरून मानधन अदा करण्यासाठी वेळापत्रकच तयार करून देण्यात आले असून त्याप्रमाणे बॅंक खात्यात मानधन थेट जमा करण्याची दक्षता घ्यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. केंद्रप्रमुखांनी दरमहा 3 तारखेपर्यंत मानधनाची देयके तालुका कार्यालयास सादर करणे आवश्‍यक आहे. तालुका कार्यालयाकडून देयकांची तपासणी करून एकत्रित देयके जिल्हा परिषदेस बॅंक यादीसह सादर करण्यासाठी 5 तारखेपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. प्राथमिक शिक्षण संचालनामार्फत स्वयंपाकी, मदतनीस यांना मानधन देण्यासाठी जिल्हा परिषदांना आगाऊ स्वरुपात निधी देण्यात येत असतो. मात्र, तरीही मानधन वेळेवर अदा केले जात नसल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. तसेच काही शाळांमध्ये पोषण आहार योजनेत अपहार होत असल्याच्या तक्रारी शिक्षण क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते यांनी केल्या आहेत. तसेच स्वयंपाकी, मदतनीस यांनी स्वत: व विविध संघटनांनी नियमितपणे मानधन मिळण्याबाबतची मागणी शिक्षण संचालक कार्यालयाकडे निवेदनाद्वारे, दूरध्वनीद्वारे केली होती. त्याची दखल घेत प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश बजाविले आहेत. 

प्रतिक्रिया
गेल्या अनेक वर्षापासून शाळेत तूटपुंज्या मानधनावर आहार शिजविण्याचे काम करीत आहे. मानधन नियमित मिळत नाही. जून महिन्यापासून एक रुपया देखील मिळाला नाही. शासनाने दिवाळीपूर्वी सर्व थकित मानधन अदा करावे. - रख्माबाई वाघ, पोषण आहार स्वयंपाकी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School Nutrition Diet Scheme honors directly on the cooking department