आंदोलक तलाठ्यालाच लाच घेताना पकडले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

पाचोरा - आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज जिल्हाभर तलाठ्यांचे धरणे आंदोलन झाले. मात्र तंबूत धरणे आंदोलन करताना एका तलाठ्याची त्याच आवारातील लाचखोरी उघड झाली. या आंदोलनात सहभागी झालेल्या लोहटार (ता. पाचोरा) येथे नियुक्तीस काळूसिंग परमार या तलाठ्याला आज सातशे रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

ज्या ठिकाणी तलाठींचे आंदोलन सुरू होते, त्या तहसील कार्यालयाच्या आवारातच त्याला रंगेहाथ पकडण्यात आल्याने खळबळ उडाली होती. तक्रारदाराला तलाठी परमार याने तक्रारदारास ठरलेली रक्कम देण्यासाठी तहसीलच्या आवारात बोलावले होते. परमार हा धरणे आंदोलन सोडून तहसील आवारात गेला व तेथेच त्याला पथकाने रंगेहाथ पकडले. 

तक्रारदार हे नाचणखेडा (ता. पाचोरा) येथील रहिवासी असून, त्यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे लोहटार (ता. पाचोरा) येथील शेतजमीन गेल्या चार ऑगस्टला दुय्यम निबंधकांकडे त्यांच्या पत्नीच्या नावे नोंदणीकृत बक्षीसपत्र करून दिली होती. तक्रारदाराने ही बक्षीसपत्राची सूची क्रमांक 2 अर्जासह बक्षीसपत्रान्वये पत्नीचे नाव शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर लावण्यासाठी जमा केली होती. त्यानंतर तक्रारदार हे या कामाच्या चौकशीसाठी तलाठी परमार याला भेटले असता त्याने तक्रारदाराकडे सातबारा उताऱ्यावर पत्नीचे नाव लावण्यासाठी हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार विभागाचे उपअधीक्षक पराग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावण्यात आला. तलाठी परमार याने तक्रारदाराकडे तडजोडीअंती सातशे रुपयांच्या लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वतः स्वीकारली. ही रक्कम स्वीकारताना परमार याला पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्या विरोधात येथील पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Talathi hand caught accepting a bribe