'कोणत्याही स्थितीत युती होणारच'; भाजपच्या बड्या नेत्याला विश्वास

Shiv sena bjp
Shiv sena bjp

धुळे : भाजप अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आजची नियोजित बैठक रद्द झाली आहे. आज, मुंबईत दोन्ही नेत्यांची बैठक होऊन युतीची घोषणा होईल, अशी आशा होती. पण, ही भेटच रद्द झाल्यामुळे युतीचे भवितव्य टांगणीला लागल्याची शंका व्यक्त होत होती. मात्र, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी युती होणार असल्याबद्दल विश्वास व्यक्त केला आहे.

काय म्हणाले दानवे?
धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा विधानसभा मतदारसंघात आज, भाजपच्या बुथ कमिटी कार्यकर्त्यांचा मेळावा होता. त्यामेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी मंत्री रावसाहेब दानवे आज येथे आले होते. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावळ सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. या मेळाव्यानंतर मंत्री दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. दानवे म्हणाले, ‘शिवसेना आणि भाजप यांची युती होणार की नाही याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. पण, दोन्ही पक्षांची युती निश्चित होणार आहे आणि निवडणुकीत दोन्ही पक्षांना २२५च्या वर जागा मिळतील आणि राज्यात पुन्हा युतीचेच सरकार सत्तेवर येईल. सध्या विरोधीपक्षांपुढे त्यांचे अस्तित्व टिकवण्याचेच आव्हान आहे. आमच्या पक्षाचा कार्यकर्ता हा विचारांशी बांधील आहे. त्यामुळे आता आमची सत्ता आली आहे आणि आणखी मजबूत होत आहे. विरोधी पक्षांमध्ये तसे नाही. त्यांचे कार्यकर्ते हे त्यांच्या नेत्यांचे कार्यकर्ते होते. त्यामुळे नेते गेल्यानंतर कार्यकर्तेही गेले आणि पक्षही संपले.’

राजकारणात माझी डॉक्टरेट झाली
दरम्यान, रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत सिंदखेडा येथे भाजपचे बुथ प्रमुख आणि पन्नाप्रमुखांचा मेळावा झाला. मेळाव्यात दानवे म्हणाले, ‘मी गेल्या २५ वर्षांपासून राजकारणात आहे. त्यामुळे राजकारणात माझी डॉक्टरेट झाली आहे. मला कार्यकर्तांचे चेहरेपाहून निकाल काय लागणार हे सांगता येते. त्यानुसार सिंदखेडा विधानसभा मतदारसंघात भाजपचा लागणारा निकाल, हा राज्यातील क्रमांक एकच्या मताधिक्याने लागेल, असे वाटते. देशाप्रमाणे राज्यात भाजपचे सर्वाधिक एक कोटी पाच लाख सदस्य आहेत. त्यामुळे बुथ प्रमुख आणि पन्ना प्रमुखांनी स्वतःला भाग्यवान समजावे की, आपण जगातील सर्वांत मोठ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहोत.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com