`इज ऑफ बिझनेस'पासून सामान्यांच्या आनंदाचा प्रश्‍न : सुप्रिया सुळे

Live Photo
Live Photo

नाशिक ः राज्यात "इज ऑफ बिझनेस' पासून सामान्य माणसाच्या आनंदाचा गंभीर प्रश्‍न तयार झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नोकऱ्या आहेत असे म्हणतात पण त्या कुणाला मिळत नाहीत, असे टीकास्त्र सोडत खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी येथे प्रत्येक गोष्टीला शिक्षा अन्‌ तुरुंगवास कशाला? असा प्रश्‍न उपस्थित केला. तसेच सरकार माय-बाप असेल, तर घाबरण्याचे कारण नाही, असे सांगत त्यांनी चुकीच्या गोष्टींवर आवाज उठवल्यास तुरुंगात जावे लागेल म्हणून लोक बोलत नाहीत असे अधोरेखित केले. 
खासदार सुळे यांचा संवादाचा कार्यक्रम राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सोमवारी (ता.26) रात्री हॉटेल ग्रीन व्ह्यूच्या पंचम हॉलमध्ये झाला. राज्यातील बेरोजगारी, ऑटोमोबाईल, खाद्य उद्योगापुढील संकटाबद्दल बोलताना त्यांनी राज्यातील 1 लाख 32 हजार लघू अन्‌ मध्यम उद्योग बंद पडल्याची माहिती उपस्थितांना दिली. मुख्यमंत्री विरोधात असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रश्‍नी सरकारला खुनी म्हणत कलम 302 लागू करण्याचा आग्रह धरत होते. मग आता 14 हजार आत्महत्या झाल्याने आम्ही कलम 302 कुणावर दाखल करायचे? असा प्रश्‍न उपस्थित करुन त्या म्हणाल्या, की "रिअल इस्टेट' क्षेत्रातील 85 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्यात. त्याचवेळी उद्योग-व्यवसाय-व्यापार करणारे सगळे लोक वाईट अशी प्रतिमा सरकारने करून घेतली आहे. त्यातूनच कर दहशतवादाचा मुद्दा कळीचा बनला. हे कमी काय म्हणून चुकीच्या पद्धतीने वापर होईल, अशा पद्धतीने दहशतवाद विरोधी कायदा केला. 21 बॅंकांनी एटीएम, किमान शिल्लक, एसएमएस सेवा शुल्कातून 16 हजार 713 कोटी कमावलेत. सामान्यांना लुटण्याचा कार्यक्रम सुरू आहे. शिवाय मुख्यमंत्री पारदर्शक कारभार आहेत म्हणतात पण माहितीचा अधिकार कमजोर केला जात आहे. कंपनी बिलाच्या माध्यमातून गुन्ह्याची सक्ती केली जात आहे. 

लोकच म्हणतील आधीचे सरकार बरे होते 
कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. जीएसटी वेळेत भरला नाही, तर शिक्षा करण्याची भीती दाखवण्यात येते. हिरव्या मिरचीला नाही पण लाल मिरचीला जीएसटी हे समजण्यासारखे नाही. त्याचप्रमाणे निर्विवाद सत्ता असताना विरोधकांना प्रोत्साहन देण्याऐवजी घाबरवण्यात येत आहे. ही सारी परिस्थिती अघोषित आणीबाणीसारखी आहे. राजकारणातील शिस्तीचे "मॉडेल' असल्याचा डंका पिटला जात असताना आयात करण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर आली आहे. त्यामुळे बिच्चारे कार्यकर्ते सतरंज्या उचलत राहणार. नवीन पॅकेजिंग करून आयातदारांकडे मते मागितली जाणार. लोकांनी ठरवायचे काय करायचे ते? सुभेदार मंत्री होतील. अशा साऱ्या गोष्टींमुळे अर्थव्यवस्था घसरत राहिल्यास ती सावरणे कठीण होईल आणि लोकच म्हणतील आधीचे सरकार बरे होते, असेही त्यांनी सांगितले. माजी खासदार समीर भुजबळ आणि शेफाली भुजबळ यांनी सुप्रिया सुळेंचे स्वागत केले. 

पत्रकारांशी सुप्रिया सुळेंचा संवाद 
0 अजित पवार यांच्याविषयीचे प्रकरण न्यायालयीन आहे. त्यावर बोलता येणार नाही. माझा न्यायालयावर पूर्ण विश्‍वास आहे. सत्य बाहेर येईल आणि आम्हाला न्याय मिळेल 
0 पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी करण्यात येणाऱ्या वक्तव्याबद्दल आश्‍चर्य वाटते. 55 वर्षांच्या राजकारणात त्यांचा कुठल्याही बॅंकेशी संबंध नव्हता 
0 ईडी, सीबीआयने चांगले काम केले आहे. त्यामुळे त्याविषयी भीती मला कशाला वाटेल? माझ्या हातून चूक होऊ नये म्हणून खबरदारी घेते 
0 राज्यात कोरडा आणि ओल्या दुष्काळाचा, बेरोजगारीचा प्रश्‍न गंभीर आहे. उद्योग अडचणीत येत आहेत. त्याबद्दल सरकार काहीही बोलत नाही 
0 पक्ष सोडून जाणाऱ्या प्रत्येकाला माझ्या शुभेच्छा आहेत. चौकशी, अडचणीतील बॅंक अथवा कारखाना यापलिकडे पक्षांतर करण्यामागे काहीच कारण नाही 
0 माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे आजारी आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी स्नुषा शेफाली भुजबळ यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. नाशिकमध्ये आल्याने त्यांची विचारपूस करणार 

नगरमधील आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबियांना 2 आठवड्यात मदत न मिळाल्यास मी आंदोलन करणार. राज्यात सरकार आल्यानंतर नोकऱ्यानिर्मितीचा प्रयत्न केला जाईल. उद्योग आणि रुग्णालयांच्या परवान्यात सुसुत्रिकीकरण केले जाईल. डॉक्‍टरांप्रमाणे वकिलांना सुरक्षाविषयक विधेयक आणले जाईल. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, सामान्य माणूस आनंदी होईल यावर भर देण्यात येईल.' 
- सुप्रिया सुळे (खासदार) 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com