Vidhansabha 2019 आघाडीचा 2 ऍडजेस्टमेंटमधून 7 जागांच्या लाभावर डोळा ; भाजपचे सानप राष्ट्रवादीत 

Logo
Logo

नाशिक ः विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय जनता पक्षाला नाशिकमधून जोरदार दणका बसला आहे. नाशिक पूर्वमधून उमेदवारी कापलेले आमदार बाळासाहेब सानप यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच कालपर्यंत (ता. 3) नाशिक पश्‍चिमची जागा मित्रपक्षाला सोडल्याचे राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ सांगत होते. पण नाशिक पश्‍चिममधून राष्ट्रवादीचे डॉ. अपूर्व हिरे यांच्या उमेदवारीचा तिढा राहिल्याने कॉंग्रेसची मालेगाव बाह्यची आणि भुजबळांचे पुत्र आमदार पंकज भुजबळ यांची नांदगावमधील जागा अडचणीत सापडली होती. अखेर नाशिक पश्‍चिममधून डॉ. हिरे यांना राष्ट्रवादीचा एबी फॉर्म पोचला. आघाडीने 2 जागांची ही ऍडजेस्टमेंट 7 जागांच्या लाभावर डोळा ठेऊन केल्याचे मानले जात आहे. 
हिरे घराण्याचे मालेगाव बाह्यप्रमाणे नांदगावमधून आवश्‍यक असलेले समर्थन लक्षात घेऊन छगन भुजबळांनी डॉ. हिरे यांच्या उमेदवारीसाठीचा आग्रह धरला होता. मात्र पक्षाकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाहीत म्हटल्यावर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. डी. एल. कराड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, कॉंग्रेसचे माजी आमदार जयप्रकाश छाजेड पोचले होते. डॉ. कराड हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोचलेले असताना डॉ. हिरे हेही कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे झेंडे लावून रॅलीद्वारे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघाले. डॉ. कराड यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कॉंग्रेसच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी श्री. ठाकरे कॉंग्रेस भवनापुढे पोचले असतानाच कॉंग्रेसच्या नेत्यांनी डॉ. हिरे यांच्याशी संपर्क साधण्यास सुरवात केली. राष्ट्रवादीचा एबी फॉर्म मिळत नसल्यास कॉंग्रेसचा एबी फॉर्म पोचवतो, असा निरोप सांगताच, डॉ. हिरे यांना राष्ट्रवादीचा एबी फॉर्म पोचल्याची माहिती मिळाल्याचे कॉंग्रेसच्या नेत्यांनी नाशिक पूर्वमधून सानप यांना राष्ट्रवादीचा एबी फॉर्म मिळतो की नाही अशी विचारणा करत, कॉंग्रेसच्या एबी फॉर्म हवा आहे काय? असा निरोप देण्यास सुरवात केली. तोपर्यंत सानप उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले होते. सानपांची उमेदवारी टिकणार काय? याची खात्री मिळताच, राष्ट्रवादीने सानपांना एबी फॉर्म देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली असताना कॉंग्रेस भवनात प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पक्षाचे गणेश उन्हवणे पोचले होते. त्यांना कॉंग्रेसतर्फे एबी फॉर्म देण्यात आला. मग नाशिक मध्य मधून डॉ. हेमलता पाटील, राहूल दिवे आणि नाशिक पूर्वमधून उन्हवणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शहराध्यक्ष शरद आहेर, माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, शैलेश कुटे, राष्ट्रवादीचे अर्जून टिळे हे रवाना झाले. 

डॉ. तुषार शेवाळेंनी वाढवला दबाव 
मालेगाव बाह्यमधून हिरे घराण्याच्या समर्थनामुळे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याविरुद्ध उमेदवारी करण्याची तयारी दर्शवली. मात्र डॉ. हिरे यांना आघाडीच्या जागांच्या समीकरणामध्ये राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्‍यता धूसर होताच, डॉ. शेवाळे यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांवर दबाव वाढवला. कॉंग्रेसकडून निरोप जाताच, राष्ट्रवादीने डॉ. हिरे यांना एबी फॉर्म दिल्याची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रंगली होती. 

जातीय समीकरणांचे जुगाड 
भाजपचे सानपांच्या उमेदवारीवरुन राष्ट्रवादीमध्ये खल चालला असताना जातीय समीकरणांचे जुगाड लावण्याचा मुद्दा स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांपर्यंत पोचवण्यात आला. ते समीकरण असे, की वंजारी समाजाच्या मतदारांची संख्या नाशिक पूर्व, पश्‍चिमसोबत नांदगाव, येवला, सिन्नर, निफाड या मतदारसंघात अधिक आहे. सानपांच्या उमेदवारीने हे जुगाड बसवणे शक्‍य आहे. या मतदारसंघांपैकी येवला छगन भुजबळांचा, त्यांचा मुलगा पंकज यांचा नांदगाव, भाजप सोडून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवणारे ऍड्‌. माणिकराव कोकाटे यांचा सिन्नर आणि राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप बनकर यांचा निफाड मतदारसंघ आहे. सानपांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीने जातीय समीकरणांच्या जुगाडाला पसंती दिल्याचे दिसून येत आहे. एकेकाळी भुजबळांचे समर्थक मानले जाणारे शिवसेनेचे येवल्यातील विधानपरिषद सदस्य नरेंद्र दराडे व त्यांचे बंधू किशोर दराडे यांनी भुजबळांच्या विरोधात शिवसेनेची मोर्चेबांधणी केली. दरम्यान, यापूर्वी झालेल्या विधानपरिषदेच्या दोन्ही निवडणुकांवेळी दराडे बंधूंसाठी सानपांनी भाजपमधील स्वकियांची नाराजी ओढावून घेतली होती. ही सारी राजकीय समीकरणे उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी राजकीय पटलावर ठळपणे पुढे आलीत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com