रयतेच्या राज्यासाठी शिवस्वराज्य यात्रा : धनंजय मुंडे

File photo
File photo

दारव्हा (जि. यवतमाळ) : राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले रयतेचे राज्य आणण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली असल्याचे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रा दारव्हा तालुक्‍यात दाखल झाल्यानंतर बोदेगाव व बोरी येथे यात्रेचे स्वागत करण्यात आले तसेच दारव्हा येथे आज, मंगळवारी दुपारी सभा पार पडली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे बोलत होते.
सभेला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार प्रकाश गजभिये, माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे, आमदार ख्वाजा बेग, अमोल मिटकरी, ऍड. आशीष देशमुख, प्रदेश सरचिटणीस वसंत घुईखेडकर, ज्येष्ठ नेते ऍड. शंकरराव राठोड, उत्तमराव शेळके, राजेंद्र पाटील, क्रांती राऊत आदी उपस्थित होते.
धनंजय मुंडे म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाधनादेश खर्चून महाजनादेश यात्रा काढली, तर आदित्य ठाकरे यांनी आशीर्वाद यात्रा काढली. या यात्रा स्वतःला मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्‍ट करण्यासाठी काढण्यात आल्या. आम्ही या यात्रेच्या माध्यमातून सरकारचे पितळ उघडे पाडू. 2014 मध्ये शिवाजी महाराजांच्या नावावर मते मागून सत्तेवर आलेल्या या सरकारने अरबी समुद्रात महाराजांचा पुतळा उभारण्याचे आश्‍वासन पूर्ण केले नाही. फसव्या शेतकरी सन्मान योजनेला महाराजांचे नाव दिले. अशा सरकारला सत्तेतून घालवा, असे आवाहन त्यांनी केले.
अजित पवार यांनी भाषणात युती सरकारने कर्जमाफीला विविध निकष लावल्याने अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नसल्याचे सांगून, आम्ही सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू तसेच आमची कर्जमाफी मात्र अशी फसवी नसेल, असे आश्‍वस्त केले. आगामी निवडणुकीत अत्यंत विचारपूर्वक सरकार निवडा, असे आवाहन त्यांनी केले.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राज्यात परिवर्तन घडविण्याचे आवाहन जनतेला केले. सध्या राज्यात बेरोजगारी, महागाई वाढली आहे. अर्थव्यवस्था नाजूक स्थितीत आहे. पक्षाचे आमदार खासदार निवडून आले की शिवसेना पक्षप्रमुख त्यांना महालक्ष्मी दर्शनाला घेऊन जातात. परंतु, ज्या पूरग्रस्त भागाने दहा आमदार दिले, त्याठिकाणी भेट द्यायला त्यांना अजून वेळ मिळाला नाही. यातून सामान्य जनतेविषयी यांना किती कळवळा आहे हे दिसून येते, अशी टीकाही त्यांनी केली.
सभेचे आयोजक वसंत घुईखेडकर यांनी प्रास्ताविकातून या भागातील विविध प्रश्‍न मांडले. अमोल मिटकरी, क्रांती राऊत यांनीही विचार व्यक्त केले. सभेचे संचालन हरीश कुडे तर आभार प्रा. चरण पवार यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com