बहिष्काराचा "टॉक शो'

File photo
File photo

शायर भाऊसाहेब पाटणकर परिसर, यवतमाळ : नयनतारा सहगल यांच्या निमंत्रणवापसीने उद्‌घाटन सोहळा गाजविल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या दोन सत्रांनाही त्याचा फटका बसला. साहित्यिकांच्या बहिष्कारामुळे मान्यवरांच्या सत्काराचे एक सत्र आयोजकांना रद्द करावे लागले, तर दुसऱ्या सत्रात केवळ एका वक्‍त्यावर आयोजकांना भागवावे लागले.
सहगल प्रकरणामुळे 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला वेगळे वळण लागले आणि संपूर्ण संमेलन याच एका विषयाभवती फिरू लागले. रसिकांनी या संमेलनाला मनापासून स्वीकारले असले तरी नियोजित वेळापत्रकातील सत्रांवर त्याचा नक्कीच परिणाम झाला. पहिल्या दिवशीच्या कविसंमेलनातून निम्मे कवी बहिष्कारामुळे बाहेर होते. तर आज दुसऱ्या दिवशी (शनिवार) सकाळी विद्या बाळ आणि भ. मा. परसवाळे यांच्या अनुपस्थितीने सत्र रद्द करण्याची नामुष्की आयोजकांवर ओढवली. या दोघांचाही साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दल साहित्य संमेलनात सत्कार होणार होता. या सत्राबद्दल आयोजकांनी शेवटपर्यंत कुठलीही अधिकृत घोषणा केली नाही. मात्र, केवळ समन्वयकवगळता दोन्ही सत्कारमूर्ती उपस्थित न झाल्याने सत्र रद्द केले.
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात गदिमांना संगीतमय मानवंदना देणाऱ्या "गदिमायन' या कार्यक्रमात बहिष्काराचे पडसाद उमटले. या कार्यक्रमात सहभागी कलावंतांनी मनगटाला काळ्या फिती बांधूनच कार्यक्रम सादर केला. दुपारच्या सत्रात "माध्यमांची स्वायत्तता' या विषयावर "टॉक शो' आयोजित करण्यात आला होता. या सत्रातील गिरीश कुबेर, ज्ञानेश महाराव, प्रा. जयदेव डोळे आणि समन्वयक संजय आवटे या चारही वक्‍त्यांनी समाजमाध्यमांवरून आपला बहिष्कार जाहीर केला होता. सत्र रद्द होणार की काय, अशी परिस्थिती होती. पण, आयोजक आश्वस्त होते. या सत्रातील एक वक्ते पुणे आकाशवाणीचे उपसंचालक नितीन केळकर उपस्थित होते आणि एका वक्‍त्यावर का होईना, आयोजकांनी हे सत्र पूर्ण केले. विशेष म्हणजे एखाद्या सत्रात केवळ एकच वक्ता उपस्थित असल्याची नामुष्कीदेखील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर पहिल्यांदाच ओढवली.
उद्याही सावट...
उद्या (रविवार) संमेलनाच्या शेवटचा दिवस आहे. या दिवसावरही बहिष्काराची गडद छाया आहे. उद्याच्या कार्यक्रमात दुपारी अडीचला डॉ. प्रभा गणोरकर यांच्या प्रकट मुलाखतीचा समावेश आहे. पण, गणोरकर यांनी यापूर्वीच संमेलनावर बहिष्कार जाहीर केला असल्यामुळे त्यांची प्रकट मुलाखतही आयोजकांना रद्द करावी लागणार आहे.
आज समारोप
92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप उद्या (रविवार) वाजणार आहे. केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्‌घाटन सोहळ्याला उपस्थित होऊ शकले नव्हते; त्यामुळे ते समारोपाला येणार, अशी आशा आयोजकांना आहे. दुपारी साडेचारला होणाऱ्या या सोहळ्याला अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांची प्रमुख उपस्थिती असेल. या सोहळ्यात सदाशिवराव ठाकरे, द. तु. नंदापुरे आणि सुभाष शर्मा यांचा सत्कार होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com