नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 जानेवारी 2019

यवतमाळ : प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक नयनतारा सहगल यांना साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण अखेर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यजमान संस्थेनेच एका ई-मेलद्वारे रद्द केल्याने साहित्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेल्याची प्रतिक्रिया साहित्य क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही व्यक्त होत आहेत.

यवतमाळ : प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक नयनतारा सहगल यांना साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण अखेर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यजमान संस्थेनेच एका ई-मेलद्वारे रद्द केल्याने साहित्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेल्याची प्रतिक्रिया साहित्य क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही व्यक्त होत आहेत.
यवतमाळ येथे ता. 11, 12 व 13 जानेवारीला 92वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार असून त्यांच्याच नेतृत्वात डॉ. वि. भि. कोलते संशोधन केंद्र व वाचनालय ही यजमान संस्था व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने या संमेलनाचे आयोजन केले आहे.
साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी संमेलनाच्या उद्घाटक म्हणून प्रख्यात इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांचे नाव उद्घाटक म्हणून सुचविले होते. त्यांच्या शिफारसीवरूनच यजमान संस्थेने नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून निमंत्रण पाठविले होते. या निमंत्रणाचा स्वीकार सहगल यांनी सहर्ष केला होता. दरम्यान, मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून इंग्रजी साहित्यिकास निमंत्रित केल्यामुळे शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी टीका केली. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी संमेलन उधळून लावण्याचा इशारा दिला. त्यामुळे संमेलनात गोंधळ होऊ नये, म्हणून यजमान संस्थेने नयनतारा सहगल यांना ई-मेल पाठवून निमंत्रण रद्द करण्यात येत असल्याचे कळविले. त्यात अपरिहार्य कारणामुळे हे निमंत्रण रद्द करण्यात येत असून आपण या संमेलनास येऊ नये, अशी विनंती करण्यात आली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेल्याची प्रतिक्रिया साहित्य क्षेत्रात उमटली.

संमेलनात गोंधळ होऊ नये, म्हणून नयनतारा सहगल यांच्या नावावर फेरविचार करण्याची विनंती संमेलनाच्या आयोजन समितीने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांना केली. त्यांच्या निर्देशावरून सहगल यांना निमंत्रण रद्द केल्याचे कळविले आहे.
- पद्माकर मलकापुरे
सहसचिव, मराठी साहित्य संमेलन आयोजन समिती

Web Title: Invitation of Nayantara Sehgal canceled