नागपूर : हिदायतुल्लांनंतर न्या. बोबडेंना सरन्यायाधीशपदी विराजमान होण्याचा मान

file photo
file photo

नागपूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सरन्यायाधीश पदासाठी मराठी व्यक्तिमत्व आणि नागपूरचे सुपूत्र असलेले न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे, विधी क्षेत्रातील व्यक्तींसह नागपूरकरांची छाती अभिमानाने उंचावली आहे. देशाचे 47 वे सरन्यायाधीश म्हणून पदग्रहण करणारे शरद बोबडे या पदी विराजमान होणारे नागपुरातील दुसरे आहेत. यापूर्वी, 1968 मध्ये मोहम्मद हिदयतुल्लांच्या रुपाने शहराला हा मान पहिल्यांदा मिळाला होता. 
न्या. बाबेडे यांच्या सरन्यायाधीशपदी झालेल्या निवडीबद्दल नोव्हेंबर अखेरीस हायकोर्ट बार असोसिएशने जंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे नियोजन केले आहे. अर्थातच, बोबडे यांच्या व्यस्त तारखांचा विचार करूनच कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. 
दिल्ली येथे होणाऱ्या पदग्रहण सोहळ्याला उपस्थित राहण्याकरिता विधी क्षेत्रातील अनेक मान्यवर जाण्याची तयारी करीत आहेत. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव मोजक्‍या लोकांना या सोहळ्याला प्रवेश दिला जाण्याची शक्‍यता आहे. 
देशाच्या सर्वोच्च पदांपैकी एक असलेल्या सरन्यायाधीशपदासाठी मावळते सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्या नावाची शिफारस केली आहे. युक्तिवाददिरम्यान मुद्दे योग्यरित्या टिपून न्यायासनसमोर मांडण्यात ते तरबेज आहेत. लाखांवर शेतकऱ्यांची न्यायालयात मांडलेली बाजू आणि प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांचा लढलेल्या खटल्यामुळे ते चर्चेत आले होते. इंग्रजी सोबतच संस्कृत आणि वेदांवर त्यांचे प्रभुत्व आहे. विद्यापीठाकडून टेनिस खेळताना त्यांनी टेनीसचे "कोर्ट'सुद्धा गाजवले आहे. यासोबतच, त्यांना वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची आवड आहे. नागपूरमध्ये असताना सुट्ट्यांच्या काळामध्ये विविध अभयारण्यामध्ये ते जंगल सफारीसाठी जात होते. त्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडीपीठात न्यायाधीश म्हणून एक वर्ष सेवा दिली आहे. 

अल्प परिचय 
न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांचा जन्म 24 एप्रिल 1956 रोजी नागपूरमध्ये झाला. वडील अरविंद बोबडे हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते. तर, थोरले बंधू विनोद बोबडे हे सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ विधीज्ञ होते. त्यामुळे, त्यांना आपल्या घरातूनच वकिली व्यवसायाचे बाळकडू मिळाले. त्यांनी सत्तरच्या दशकात महाविद्यालयीन शिक्षण शहरातील सेन्ट फ्रान्सीस दी सेल्स हायस्कूल (एसएफएस) मधून पूर्ण केले. विधी शाखेची पदवी 1978 साली घेत सनद मिळविली. त्यानंतर, त्यांनी वकिली सुरू केली. 1998 साली वरिष्ठ विधिज्ञ आणि 29 मार्च 2000 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी ते विराजमान झाले. त्यानंतर, त्यांनी मागे वळून पाहिले नाही. पुढे ऑक्‍टोबर 2012 साली ते मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती झाले आणि एप्रिल 2013 साली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com