महिन्याभरात कांद्याचे भाव गगनाला

कृष्णा लोखंडे
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

देशांतर्गत एकूण लागवडीच्या केवळ पाच टक्के क्षेत्रातच कांद्याची दुसरी लागवड झाली. राज्यात पहिल्या लागवडीतून (खरीप हंगाम) उत्पादित कांद्याचा साठा मार्चपर्यंत पुरतो. यंदा पहिल्याचेच लागवडक्षेत्र कमी राहिल्याने आणि उत्पादन कमी झाल्याने साठा मर्यादित राहिला.

अमरावती : आहारात महत्त्वपूर्ण असलेल्या कांद्याचे भाव महिन्याभरात गगनाला भिडण्याचे संकेत आहेत. एरवी डोळ्यांत पाणी आणणारा कांद्याचा भाव 80 ते 90 रुपये किलोप्रमाणे वधारण्याची शक्‍यताही व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.

एप्रिलमध्ये येणाऱ्या कांद्याचा साठा संपत आला. कांद्याची दुसरी लागवड अत्यंत कमी असल्याने त्याचा थेट परिणाम भाववाढीवर होणार आहे. देशांतर्गत एकूण लागवडीच्या केवळ पाच टक्के क्षेत्रातच कांद्याची दुसरी लागवड झाली. राज्यात पहिल्या लागवडीतून (खरीप हंगाम) उत्पादित कांद्याचा साठा मार्चपर्यंत पुरतो. यंदा पहिल्याचेच लागवडक्षेत्र कमी राहिल्याने आणि उत्पादन कमी झाल्याने साठा मर्यादित राहिला. देशांतर्गत हीच स्थिती राहिल्याने कांद्याची चणचण भासणार आहे. जानेवारीत कांद्याचे भाव तडकण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.

गतवर्षापासूनच कांद्याचे लागवडक्षेत्र कमी झाले. यंदाच्या तुलनेत तो अधिक असताना 40 ते 50 रुपये किलो या भावाने विकला गेला. बियाण्यांच्या किमती 2 हजार रुपये किलो असून, पोळ्यापासूनच कांदा बाजारात सुधारणा न झाल्याने त्याचा परिणाम कांद्याच्या दुसऱ्या लागवडीवर झाला. शेतकऱ्यांची मानसिकता बदलून त्यांनी रब्बीतील कांद्याचे लागवडक्षेत्र कमी करून हरभऱ्याच्या पेरणीला प्राधान्य दिले. जगभरात 60 टक्के कांदा हा एकट्या भारतातून पुरविला जातो; मात्र यंदा भारतातच कांद्याची कमतरता भासणार आहे.

पहिल्या लागवडीचा साठा संपला
खरीप हंगामातील कांदा संपत आला; तर रब्बी हंगामाचे उत्पादन येण्यास बराच अवकाश आहे. या हंगामात कांद्याची लागवड अत्यल्प असल्याने उत्पादनही कमीच राहणार. त्याचा थेट परिणाम भाववाढीवर होईल, असा अंदाज आहे. सध्या आंध्र प्रदेश व कर्नाटकातून कांदा येतो. मात्र, भविष्यात हा साठा अपुरा पडणार आहे. कांदा नाशिवंत असल्याने तो जास्त प्रमाणात साठवून ठेवता येत नाही. त्याचाही परिणाम भाववाढीवर होऊ शकतो, असे कांद्याचे घाऊक व्यापारी सतीश कावरे यांचे म्हणणे आहे.

Web Title: Onion prices may shoot up next month, reports Krushna Lokhande