रानातील पशुपक्ष्यांना मिळू लागले पावसाचे संकेत

file photo
file photo

गडचिरोली : निसर्गाशी एकरूप झालेल्या पशुपक्ष्यांना निसर्गातील, रानातील सूक्ष्म बदलही सहजपणे टिपता येतात. भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीची चाहूलही काही प्राणी-पक्ष्यांना लागते. मागील काही दिवसांपासून रानातील पाखरांच्या हालचालीत बदल दिसून येत आहेत. त्यावरून पशुपक्ष्यांना पावसाचे संकेत मिळत असल्याचा अनुमान काढला जात आहे.
पावसाळा हा बहुतांश पक्ष्यांचा विणीचा हंगाम असल्याने पावसाची चाहूल पक्षीजगतात चैतन्य निर्माण करणारी असते. त्याचा परिणाम त्यांच्यावर होतो. गडचिरोली जंगलातल्या नर गायबगळ्यांमध्ये काही बदल दिसायला लागले आहेत. या नरांना सोनेरी पिसे आली आहेत. त्यामुळे ते सोनेरी अंगरखा घातल्यासारखे दिसत आहेत. या पिसांमुळे माद्या आकर्षित होतात. त्यामुळे इंग्रजीत गमतीने या पिसांना त्याला "वेडिंग सूट' म्हणजे विवाह वस्त्रे असेही म्हणतात. दयाळ पक्षीही उंच झाडाच्या शेंड्यावर बसून सुरेल ताना छेडतात, तर पिवळाजर्द हळद्या सोबतिणीसोबत शीळ घालत रानातून फिरत असल्याचे आढळून येत आहे.
फूटभर लांबीचे शेपूट फडकवत पांढराशुभ्र स्वर्गनाचण व मुनिया पक्षीही घरट्याची जागा शोधण्यात गर्क आहे. सुगरण पक्ष्यांचे थवे उंच झाडांवर घरटे बांधण्यासाठी सुरक्षित ठिकाण शोधत आहे. लालबुड्या बुलबुल, मैना, चष्मेवाला, सुभग, कोतवाल, शिंजिर, नवरंगा अशा अनेक पक्ष्यांचे बदललेले स्वर, रंग, जोडीदाराशी सलगी करण्यासोबत घरट्यांसाठीची लगबग आता पावसाळ्यातील विणीच्या हंगामाला प्रारंभ होईल, हेच सांगत आहे.

रानातील पशुपक्ष्यांना निसर्गातील बदल टिपता येतात. पावसाळ्याच्या प्रारंभी मोराचा पिसारा खुलतो, तो नृत्य करायला लागतो, अनेक पक्ष्यांना नवी पिसं येतात, काही पक्ष्यांचे स्वर सुरेल होतात किंवा त्यांना कंठ फुटतो. हिवाळ्यात, स्थलांतराच्या काळातही पशूपक्ष्यांमध्ये अनेक बदल बघायला मिळतात. सुगरणसारखे पक्षी, तर पाऊस लांबणार असे लक्षात येताच चक्‍क घरटे बांधणे थांबवतात. ऋतूबदलाची ही जाणीव त्यांना कशी होते, यावर जगभर संशोधन सुरू आहे.
- संजय करकरे,
सहायक संचालक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com