संघाच्या प्रवासी कार्यकर्ता शिबिराला सुरवात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

अमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित विदर्भ प्रांत प्रवासी स्वयंसेवकांच्या तीनदिवसीय शिबिराला आज शुक्रवारी (ता. 18) प्रारंभ झाला. शिबिराचा परिसर गजबजला असून स्वयंसेवक शिबिरस्थळी पोहोचले आहेत. दरम्यान, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आज सायंकाळी अमरावतीत दाखल झाले. त्यांचा तीनही दिवस शिबिरस्थळीच मुक्काम राहणार आहे.

बडनेरा मार्गावरील सिपना महाविद्यालयाला लागून असलेल्या 25 एकर जागेवर हे भव्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यात पाच हजारांवर स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. शिबिराच्या परिसरात दाखल होणाऱ्या स्वयंसेवकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता, तर अनेक स्वयंसेवक घोषणा देत शिबिरस्थळी पोहोचत होते. याठिकाणी कर्नाटक येथील सरकार्यवाह भागयाजी, विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, विदर्भ प्रांत सहसंघचालक चंद्रशेखर राठी यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला.
शनिवारी (ता. 19) पहाटे पाचपासून दिनचर्येला सुरवात होणार आहे. दोन दिवसांच्या या शिबिरात सरसंघचालक शिबिरार्थींना तीन सत्रांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.
स्वयंसेवकांच्या निवासाची तसेच भोजनाची व्यवस्था विविध विभागांत होणार असून शिबिराकरिता भव्य सभागृह तयार करण्यात आले आहे. सरसंघचालकांचा मुक्काम राहणार असल्याने कालपासूनच पोलिस प्रशासनाने येथील सुरक्षा व्यवस्था वाढविली असून 350 पेक्षा अधिक पोलिस शिबिस्थळी तैनात करण्यात आले आहेत.
सरसंघचालकांचे आज सायंकाळी शहरात आगमन होताच ते सर्वांत आधी माजी विदर्भ प्रांत संघचालक दिवंगत दादाराव भडके यांच्या राठीनगर येथील निवासस्थानी गेले, त्या ठिकाणी त्यांनी श्री. भडके यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांचे शिबिरस्थळी आगमन झाले. तेथे त्यांचे औक्षवण करण्यात आले. याठिकाणी स्वागत समितीच्या सदस्यांनी त्यांचे स्वागत केले. या समितीच्या 40 सदस्यांसोबत मोहन भागवत यांनी दहा मिनिटे संवाद साधला. त्यांना योग्य त्या सूचना दिल्यावर सरसंघचालक त्यांच्या कक्षात पोहोचले.

Web Title: rss shibir started at amravati