पवार साहेबांचा थेट संत्रा निर्यातदाराला फोन, म्हणाले हे...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

- साहेब, विदर्भालाही उभारी द्या, शेतकऱ्यांचे शरद पवारांकडे साकडे 
- संत्रा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद 
- शेतकऱ्यांनी पवारांकडे केले हलके मन 
- कर्जमाफीसाठी घातले साकडे 

नागपूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर शुक्रवारी (ता. 15) त्यांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद संवाद साधला. यावेळी पश्‍चिम महाराष्ट्राप्रमाणे विदर्भाला देखील उभारी द्या, असे साकडे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी घातले. संत्राउत्पादक शेतकरी रविभावनात शरद पवार यांच्यासमोर व्यथा मांडत होते. दरम्यान, पवार यांनी भर बैठकीतून चीनमध्ये निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांना थेट फोन लावला. तसेच नागपूरच्या शेतकऱ्यांचा संत्रा खरेदी करण्याची विनंती केली. 

डोळ्यांतून अश्रू ढाळत नुकसानभरपाई देण्याची मागणी 
शरद पवार यांनी गुरुवारी (ता. 14) कामठी तालुक्‍यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पीकांची पाहणी केली. यावेळी पाणावलेल्या डोळ्यांनी शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर व्यथा मांडल्या. दिवाळीच्या दिवशी झालेल्या परतीच्या मुसळधार वादळी पावसाने कामठी तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात धान पिकाचे नुकसान झाले आहे. आसोली महालगाव येथील रामदास ढोगे यांच्या शेतातील बांधावर जाऊन धान पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. असता रामदास ढोगे यांनी डोळ्यातून अश्रू ढासळत धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती देऊन धानपीक शेतकऱ्यांना प्रतिएकर 30 हजार रुपये शासनाकडून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. पवार यांनी धान पिकाचे नुकसान, लागणारा खर्च, पंचनामे झाले काय विचारले असता एकही अधिकारी आला नाही पंचनामे झाले नसल्याची तक्रार केली. 

तत्काळ बैठक घेणार 
निसर्गाचा फटका अन्‌ दरबारी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांनी अर्जाव करावा तरी कुणाकडे? अशी परिस्थिती असताना महाराष्ट्राच्या जाणत्या राजाने त्याच्या शिवारात पाय ठेवला. शेतकऱ्यांच्या भावनांना जणू पाझरच फुटला, पाणावलेले डोळे आणि आपबीती सांगण्यासाठी जीवाला एकवटून हिमतीने सारे काही शेतकरी बोलून गेले. कर्जाचा बोझा रिता झाल्याशिवाय शांत झोप येणार नाही, असा विनंतीवजा आग्रह शरद पवार यांच्याकडे शेतकऱ्यांकडे धरला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तत्काळ या विषयावर बैठक घेणार असल्याचे शेतकऱ्यांना सांगत त्यांना दिलासा दिला. 

कर्जमाफीच करा साहेब 
धारगाव येथील सुधीर परनाटे यांच्या कपाशीची पाहणी पवार यांनी केली. त्यावेळी शेतकऱ्याने साहेब, तुमच्या पक्षाच्या नेतृत्वात सरकार लवकरात लवकर स्थापन करा. शेतकऱ्यांना तुम्हीच न्याय देऊ शकता. त्यामुळे तुमच्याकडून आम्हाला पीक नुकसानासाठी तात्पुरत्या मदतीऐवजी सरसकट कर्जमाफीची अपेक्षा आहे, असे सांगितले. त्यांनी यावेळी कपाशीच्या व्यवस्थापनावरील एकूण खर्च तसेच मिळणारे उत्पन्न याविषयी माहिती घेतली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad pawar conversation with orange farmers of nagpur