मुख्यमंत्र्यांना आवडले शिंगाडे अन्‌ डाळिंब

 अमरावती : मुख्यमंत्र्यांच्या व्हीसीला उपस्थित शेतकरी व अधिकारी.
अमरावती : मुख्यमंत्र्यांच्या व्हीसीला उपस्थित शेतकरी व अधिकारी.

अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोंदियाचे शिंगाडे आणि सोलापूरची डाळिंब नुसतीच आवडली नाही तर चक्क ते चाखण्याची इच्छा झाली. शेतकऱ्यांनीसुद्धा दरियादिली आणि तेवढाच हजरजबाबीपणा दाखवून लोकसंवादाच्या शेतीत हशाची खसखस पिकविली.
मुख्यमंत्र्यांनी सोमवारी (ता. 14) राज्यातील शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. शासकीय योजनेच्या माध्यमातून प्रगतीचा आलेख उंचावणाऱ्या शेतकऱ्यांना या संवादात सहभागी करण्यात आले. लोकसंवादाचे फेसबुक लाइव्ह करून या उपक्रमाला सोशल मीडियाद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. शासकीय योजनेचे अनुदान मिळविण्यासाठी कोणाला पैसे द्यावे लागले का, खरं सांगा, असा प्रश्‍न मुख्यमंत्र्यांनी विचारला.
गोंदिया येथील शेतकऱ्याने शिंगाडे शेतीची, तर सोलापूरच्या शेतकऱ्याने डाळिंब व जरबेरा पिकाची यशोगाथा सांगितली. ते ऐकून शिंगाडे आणि डाळिंब खायची इच्छा होत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र, शिंगाड्याचे पीक डिसेंबरमध्येच संपते, असे म्हणत शेतकऱ्याने हजरजबाबीपणा तर सोलापूरच्या शेतकऱ्याने डाळिंबाची पेटीच पाठवून देण्याची तयारी दर्शविली. जळगाव व यवतमाळच्या शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाची महती आणि स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील दोष दाखविला. त्यावरून योजनेच्या पुनर्रचनेचा विचार केला जाईल. बॅंकेचे कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त योजनांचा फायदा देण्याचा मनोदय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त करीत कृषी फीडर सौरऊर्जेवर आणून दिवसा अखंडित वीजपुरवठ्याची ग्वाही शेतकऱ्यांना दिली. कृषिक्षेत्र सुजलाम्‌-सुफलाम्‌ करण्याची इच्छा आहे; पण त्याला तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागेल. प्रयोगशील शेतकऱ्यांपासून इतर शेतकरी प्रेरणा घेतील, अशी मुख्यमंत्र्यांनी व्यक्‍त केली.
महा ऍग्रिटेकचा शुभारंभ
मुख्यमंत्र्यांनी यावेळी महा ऍग्रिटेक योजनेचा शुभारंभ केला. इस्त्रोच्या साहाय्याने उपग्रहाच्या माध्यमातून तूर्त सहा जिल्ह्यातील दीड कोटी शेतकऱ्यांच्या शेतीचे व्यवस्थापन तसेच पेरणीपासून ते कापणीपर्यंत शेतीपिकांचे डिजिटल ट्रॅकिंग केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com