मराठा आरक्षणासाठी आत्मदहनाचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

अमरावती : मराठा आरक्षणासाठी संजय कदम या व्यक्तीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात गुरुवारी (ता. दोन) दुपारी अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. खासगी सुरक्षारक्षक व पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला.

अमरावती : मराठा आरक्षणासाठी संजय कदम या व्यक्तीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात गुरुवारी (ता. दोन) दुपारी अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. खासगी सुरक्षारक्षक व पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला.
संजय महादेवराव कदम (45) हे वडाळी येथील रहिवासी आहेत. दुपारी जिल्हाधिकारी सभागृहात बैठक सुरू असताना कार्यालयाच्या पूर्व आग्नेयमुखी प्रवेशद्वाराकडून संजय हे कचेरीच्या परिसरात धावत आले. मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी घोषणा देत त्यांनी बाटलीत आणलेले केरोसीन अंगावर ओतले. खासगी सुरक्षारक्षक प्रमोद माहुरकर व तैनात पोलिस कर्मचाऱ्यांनी अवघ्या काही क्षणांतच ताब्यात घेऊन त्यांच्यावर नियंत्रण मिळविले. गाडगेनगर पोलिसांनी संजय कदम यांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली.
संजय कदम हे अत्यंत संवेदनशील स्वभावाचे व सर्वसामान्य कुटुंबाचे सदस्य आहेत. एमआयडीसीत कामाला जातात. शिवाय मिरची, मसाल्याचा गृहोद्योग चालवितात, अशी माहिती आहे. याअगोदर 2008 मध्ये अंजनगावसुर्जी येथील एका शेतकऱ्याने शेतीच्या वादातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात स्वतःला पेटवून आत्महत्या केली होती. त्या घटनेची पुनरावृत्ती खासगी सुरक्षारक्षक व तैनात पोलिसांच्या सतर्कतेने आज टळली. कदम यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई व आत्महत्येचा प्रयत्न केल्याबाबतचा गुन्हा नोंदविल्याचे गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घडलेल्या या प्रकारानंतर एक फौजदार व पाच कर्मचारी तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
म्हणून आत्मदहन...
मराठे मेले नाहीत, शहीद झालेत. आम्हीसुद्धा शहीद होऊन जाऊ. छत्रपती शिवाजी महाराज तमाम हिंदूंसाठी लढले. आता हे सरकार मराठा आरक्षणासाठी केवळ तारखेवर तारीख देत आहे. या प्रकाराला त्रासून आत्मदहन करीत आहे. आम्ही कुणालाही मारणार नाही. देशातील एक-एक नागरिक आमचा बांधव आहे, असे संजय कदम या वेळी पोलिसांना ओरडून सांगत होते.

Web Title: sucide attempt at collector office premises