कर्तव्यात कसुरीबद्दल दोन अधिकारी निलंबित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

अकोला - पाळा येथील आश्रमशाळेच्या आदिवासी विद्यार्थिनींच्या अत्याचारप्रकरणी आठ कर्मचाऱ्यांना निलंबित केल्यानंतर आज एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभागातील सहायक प्रकल्प अधिकारी सुरेश सुतार व कनिष्ठ विस्तार शिक्षण अधिकारी वंदना वानखडे यांच्यावरही निलंबनाची कुऱ्हाड कोसळली. या कारवाईमुळे अन्य अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 

अकोला - पाळा येथील आश्रमशाळेच्या आदिवासी विद्यार्थिनींच्या अत्याचारप्रकरणी आठ कर्मचाऱ्यांना निलंबित केल्यानंतर आज एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभागातील सहायक प्रकल्प अधिकारी सुरेश सुतार व कनिष्ठ विस्तार शिक्षण अधिकारी वंदना वानखडे यांच्यावरही निलंबनाची कुऱ्हाड कोसळली. या कारवाईमुळे अन्य अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 

खामगाव तालुक्‍यातील पाळा येथील श्री. रामचंद्र महाराज सेवाभावी संस्था गणेशपूरद्वारा संचालित निंबाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा व आयुक्त राजू जाधव यांनी रविवारी आश्रमशाळेला भेट देऊन प्रकरणाचा आढावा घेतला. विद्यार्थिनींचे जबाब नोंदवले. पालकांशी चर्चा केली. तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले. मुख्याध्यापकाने या प्रकरणाची माहिती दडविल्याचेही स्पष्ट झाले. याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला. राज्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये सीसी कॅमेरे लावणे बंधनकारक करा. यामुळे अशा प्रकारांना आळा बसू शकेल अशा सूचना सवरा यांनी दिल्या. 

आश्रमशाळेवर तपासणीच्या माध्यमातून नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयातील अधिकाऱ्यांना खडसावले. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. या गंभीर प्रकाराची दखल घेत विभागाचे आयुक्त राजू जाधव यांनी तातडीने मुख्याध्यापकासह आठ जणांना निलंबित केले आहे. आज या प्रकरणी मंत्रालयात आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांनी आयुक्तांना पाचारण केले होते. या वेळी आदिवासी विकास आयुक्त राजू जाधव यांच्याकडून प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर अकोला प्रकल्प कार्यालयातील सुरेश सुतार व कनिष्ठ विस्तार शिक्षण अधिकारी वंदना वानखडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. 

यामुळे झाली कारवाई 

सहायक प्रकल्प अधिकारी सुरेश सुतार यांच्याकडे दरमहा आश्रमशाळांना भेटी देऊन वस्तुस्थिती तपासण्याची जबाबदारी आहे. मात्र, त्यांनी आतापर्यंत एकही भेट दिली नसल्याचे वरिष्ठांना आढळले. कनिष्ठ विस्तार शिक्षण अधिकारी वंदना वानखडे यांनी भेटी दिल्या; पण "व्हिजिट बुक'मध्ये गंभीर बाबींचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळल्याचे दिसून आले. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या दोन्ही अधिकाऱ्यांना आयुक्तांच्या आदेशान्वये अप्पर आयुक्त अमरावती यांनी निलंबित केले. 

कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी सोमवारी सहायक प्रकल्प अधिकारी सुरेश सुतार व कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी वंदना वानखडे यांच्यावर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई सोमवारी केली. प्रशासनाकडून अशा कर्मचाऱ्यांचा बचाव कदापि सहन केला जाणार नाही. आश्रमशाळा कोणतीही असो गैरप्रकार झाल्यास निश्‍चित कारवाई केली जाईल. 

- वंदना सोनवणे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प, अकोला 

Web Title: Two officials suspended for not performing duty