आडकोजी महाराजांच्या जन्मस्थळाचा लागला शोध

राजेश सोळंकी
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

आर्वी (जि. वर्धा) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे गुरू श्रीआडकोजी महाराज यांची आर्वी ही जन्मभूमी. मात्र, कालौघात त्यांचे जन्मस्थळ असलेल्या घराची माहिती विस्मृतीत गेली. "सकाळ'ने शोधमोहीम राबवीत आडकोजी महाराज यांचे पडक्‍या स्थितीतील घर शोधून काढले. येथील इंग्रजकालीन लोखंडी पुलाजवळ कसबा परिसरात हे घर आहे. परिसरातील जुन्याजाणत्यांशी चर्चा, मायबाई मठातील ज्येष्ठांशी संवाद आणि पुढे आलेल्या काही पुराव्यांची पडताळणी केल्यावर आडकोजी महाराजांच्या घराची ओळख पटली.

आडकोजी महाराजांनी त्यांच्या शंभराव्या जन्मदिनी श्रीक्षेत्र वरखेड येथे जिवंत समाधी घेतली. संत ज्ञानेश्‍वर यांच्यानंतर संजीवन समाधी घेणारे आडकोजी महाराज हे दुसरेच संत. आडकोजी महाराज यांची गुरुपरंपरा आदिनाथांची मानली जाते. संत आडकोजी महाराज यांचा जन्म येथील इंग्रजकालीन लोखंडी पुलाजवळ कसबा येथे कासार कुळात 14 नोव्हेंबर 1821 रोजी त्रिपुरारी पौर्णिमेला झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सदाशिवराव फिसके होते. आर्वी येथे संत मायबाईचा प्रसिद्ध मठ आहे. या संत मायबाईच आडकोजी महाराजांच्या आध्यात्मिक गुरू होत्या. आडकोजी महाराजांचा जन्म आर्वी येथेच कासारपुऱ्यातील फिसके कुटुंबात झाला. हे घर त्यांचेच होते. कालांतराने ते विकल्या गेले. याकडे कोणीही लक्ष दिले नाही, अशी माहिती मायबाई मठाचे संचालक कृष्णा हनुमंत गिरधर यांनी दिली.
संत मायबाई यांचा अनुग्रह झाल्यावर आडकोजी महाराज विदेही अवस्थेत गेले. तेथून काही काळ ते दहेगाव मुस्तफा येथे राहिले. त्यानंतर त्याच विदेही अवस्थेत ते वरखेड येथे निघून आले आणि तेथेच एका आसनावर स्थानापन्न झाले. येथेच त्यांनी त्यांच्या समाधीची तीन महिन्यांच्या आधीच पूर्वतयारी करून घेतली होती.
आडकोजी महाराज यांचा जन्म आर्वी येथे झाला हे राष्ट्रसंतांना माहीत होते; पण नेमका कुठे झाला, हे माहीत नव्हते. राष्ट्रसंतांचे गुरू असलेल्या या महान विभुतीने जेथे जन्म घेतला, त्या घराची आता मात्र दुरवस्था झाली आहे. आडकोजी महाराजांनी समाजामध्ये आध्यात्मिक प्रेरणेचा प्रसार करून मोठी कामगिरी केली. या महान विभुतीच्या जन्मस्थळाच्या जीर्णोद्धारासह परिसरात त्यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी अपेक्षा गुरुदेवभक्तांनी व्यक्त केली आहे.
तेव्हापासून महाराज तुकडोजींचे गुरू झाले
नागपूर येथील गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते ज्ञानेश्‍वर रक्षक यांनी आडकुडी महारांबाबत रोचक कथा सांगितली. तुकडोजी महाराज लहान असताना त्यांना घेऊन त्यांची आई आडकोजी महाराजांच्या दर्शनाला गेल्या होत्या. तेथेच त्यांनी तुकडोजींना आडकोजींच्या झोळीत टाकले. तेव्हापासून आडकोजी महाराज हे तुकडोजींचे गुरू झाले.

Web Title: VARDHA NEWS

टॅग्स