wari 2019 : माउलींच्या पालखीचे फलटणला स्वागत 

व्यंकटेश देशपांडे
Friday, 5 July 2019

संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे येथे आज सायंकाळी पाच वाजता मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. जिंती नाक्‍यावर पालिका प्रशासनासह विविध संस्थांच्या वतीने पालखीला पुष्पहार अर्पण करून नागरिकांनी मनोभावे स्वागत केले. 

फलटण -  संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे येथे आज सायंकाळी पाच वाजता मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. जिंती नाक्‍यावर पालिका प्रशासनासह विविध संस्थांच्या वतीने पालखीला पुष्पहार अर्पण करून नागरिकांनी मनोभावे स्वागत केले. 

तरडगावचा मुक्काम संपवून संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा आज सकाळी फलटणकडे येत असताना वाटेत काळज, सुरवडी, निंभोरे, वडजल आदी ठिकाणी संबंधित ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व भाविकांनी सुखद अंतःकरणाने पालखीचे स्वागत केले. शहरात सोहळा येताच मलठणमार्गे सद्‌गुरू हरिबुवा महाराजांच्या समाधी मंदिरावरून पाचबत्ती चौकात आला. रंगीबेरंगी रांगोळ्यांनी शहरातील पालखी मार्ग सुशोभित केला होता. बुरुड गल्ली, बादशाही मशीद रस्त्यावरून पालखी राम मंदिर चौकात येताच नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने पालखीचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर यांनी पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. तेथून पालखी गजानन चौक, महात्मा फुले पुतळा, गिरवी नाक्‍यावरून वन उद्यानमार्गे मुक्कामाच्या तळावर पावणेसहा वाजता पोचली. 

तळावर समाज आरतीसाठी जमलेले वैष्णव माउलींचा गजर करीत दिंडीकरी उभे राहून पताका नाचवत होते. जमलेल्या भाविकांच्या मध्ये पालखी आसनावर ठेवल्यानंतर चोपदारांनी दंड उंचावताच सर्वत्र शांतता पसरली. हरवले सापडले याचे विवेचन करण्यात आले. नंतर संत ज्ञानेश्वर व संत तुकारामांची आरती होताच सेवेकऱ्यांनी पालखी खांद्यावर घेऊन दर्शन तंबूत नेऊन ठेवताच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. उद्या सकाळी सहा वाजता सोहळा बरड मुक्कामाकडे निघणार आहे. 

वारकऱ्यांसाठी शिबिर  
दरम्यान, शहराच्या विविध भागांत आज दिवसभर वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, डोळे तपासून चष्मा वाटप, तसेच केळी, बिस्किटे, राजगिरा लाडू वाटप करण्यात आले. यात शहरातील लायन्स व लायनेस क्‍लब, माउली फाउंडेशन, ज्येष्ठ नागरिक संघ, पत्रकार संघटना, जायंट ग्रुप, तरुण मंडळे, देवस्थान ट्रस्ट, जैन संघटना यांचा समावेश होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sant Dnyaneshwar maharaj palkhi in phaltan